वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 08:34 AM2021-11-13T08:34:21+5:302021-11-13T08:34:34+5:30
रेल्वेच्या २३ एकर जमिनीवर उद्यानासाठीही पाठपुरावा
- विकास झाडे
नवी दिल्ली : तब्बल १३ वर्षांपासून रखडलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाची सर्व माहिती घेऊन विलंबाची कारणे शोधण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रकल्प लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांना दिली. त्यामुळे हा प्रकल्प आता ‘फास्ट ट्रॅक’वर येईल.
रखडलेला रेल्वे प्रकल्प व यवतमाळात रेल्वेच्या २३ एकर जमिनीवर उद्यान करण्यात यावे यासाठी दर्डा यांनी प्रकल्प मंजूर झाल्यापासून १३ वर्षांत दहा केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची अनेकदा भेट घेतली आणि शेकडो वेळा पत्रव्यवहार केले. आदिवासी, शेतकरी, गरीब व सामान्य जनतेसाठी जीवनवाहिनी ठरणारा हा प्रकल्प मार्गी लागावा, म्हणून दर्डा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.
दर्डा यांनी राज्यसभेतही संसदीय आयुधांचा वापर करून, यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास यावा म्हणून विषय लावून धरले होते. या प्रकल्पात केंद्र सरकारचा ६० टक्के, तर महाराष्ट्र सरकारचा ४० टक्के वाटा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला प्राधान्य देत वॉररूममध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना समीक्षा करण्याची सूचना दिली होती; परंतु त्या कामाची गती संथ असल्याचे पत्रही दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.
नांदेडपासून यवतमाळकडील काही भाग आणि यवतमाळपासून कळंबकडील भागात भूसंपादन अत्यंत संथगतीने सुरू आहे. भूसंपादनाची गती वाढविण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्या लागतील, याकडे दर्डा यांनी लक्ष वेधले. अश्विनी वैष्णव यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून, प्रकल्प का रखडला, याची सर्व माहिती चौकशी करून सादर करायला सांगितली. या प्रकल्पात आपण लक्ष घालू, त्याला वेग देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यवतमाळच्या जागेवर उद्यान
यवतमाळ शहरात एकही मोठे उद्यान नाही. येथील रेल्वेच्या २३ एकर जागेवर उद्यान व्हावे आणि यवतमाळच्या जनतेला त्याचा लाभ व्हावा म्हणून विजय दर्डा गेली कित्येक वर्षे पाठपुरावा करीत आहेत. रेल्वेच्या उद्यानामुळे शहरातील लोकांची चांगली सोय होणार आहे. मात्र या जागेवर सतत अतिक्रमण होत असते. या उद्यानाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी केले होते. मात्र, उद्यान विकसित झाले नसल्याकडे दर्डा यांनी लक्ष वेधताच रेल्वेमंत्री वैष्णव यांनी त्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही जागा विकसित करून तिचा योग्य उपयोग करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.