कडाक्याच्या थंडीची उत्तर भारतात लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 05:13 AM2018-12-25T05:13:45+5:302018-12-25T05:13:48+5:30
दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा सर्व उत्तर भारतात रविवारपासून थंडीची लाट पसरली असून, सोमवारी श्रीनगरमध्ये रविवारी रात्री ११ वर्षांतील नीचांकी तापमान नोंदले गेले.
चंदीगड : दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा सर्व उत्तर भारतात रविवारपासून थंडीची लाट पसरली असून, सोमवारी श्रीनगरमध्ये रविवारी रात्री ११ वर्षांतील नीचांकी तापमान नोंदले गेले. येथे किमान तापमान उणे ६.८ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे सोमवारी डल लेक आणि परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांतील पाणी गोठले गेले.
सकाळी पसरलेल्या धुक्यामुळे वाहनांना समोरील काही दिसत नव्हते. त्यामुळे झज्जर जिल्ह्यात एका जीपने ट्रकला धडक दिल्याने ७ जण ठार झाले. झज्जर बायपासवर सकाळी धुक्यामुळे हा अपघात झाला. या अपघातानंतर किमान ५0 वाहने एकमेकांवर आदळली.
श्रीनगरमध्ये आतापर्यंतचे नीचांकी तापमान १३ डिसेंबर १९३४ रोजी उणे १२.८ अंश सेल्सिअस नोंदले गेलेले आहे. ३१ डिसेंबर २००७ रोजी शहरात किमान तापमान उणे ७.२ अंश सेल्सिअस होते. उत्तर काश्मीरच्या कुपवाडात उणे ६, पहलगाम उणे ७.२, गुलमर्ग उणे ६.८, लेह उणे १४.७, कारगिल उणे १५.३ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदले गेले.
अमृतसरमधील किमान तापमान १.१ अंश सेल्सिअस एवढे नीचांकावर पोहोचले आहे. अमृतसर आणि हलवारामध्ये किमान तापमान सारखेच राहिले. लुधियाना, पटियाला, आदमपूर, अमृतसर, हलवारा, सिरसा, भिवानी, रोहतक, झज्जर आणि अंबालासह दोन राज्यांत धुक्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी होती. आदमपूरमध्ये किमान तापमान १.६, बठिंडात ३.२ अंश सेल्सिअस होते. हरियाणात कर्नाल सर्वात थंड ठिकाण राहिले. येथे तापमान ३.४ अंश सेल्सिअस होते. अंबाला आणि हिसारमध्ये किमान तापमान ३.८ आणि ४.५ अंश सेल्सिअस होते. संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये तापमान ५.४ अंश सेल्सिअस होते. (वृत्तसंस्था)
दिल्ली प्रदूषितच
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत हवेच्या प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या (सीपीसीबी) शिफारशींवर पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने (ईपीसीए) सोमवारी दिल्लीतील औद्योगिक परिसरातील कामकाज बंद ठेवण्यास सांगितले आहे.
दिल्ली, फरिदाबाद, गुरुग्राम, गाजियाबाद आणि नोएडामध्ये प्रदूषण करणारे अनेक उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.