कौतुकास्पद; घरांच्या नेमप्लेटवर मुलींचे नाव!
By admin | Published: July 30, 2016 02:18 AM2016-07-30T02:18:24+5:302016-07-30T02:18:24+5:30
घराचा उंबरठा ओलांडून तिने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली. या घटनांनाही एव्हाना बराच काळ लोटला आहे. पण, चौकटीबाहेरच्या या स्त्रीला खरोखरच आजही प्रतिष्ठा मान, सन्मान मिळतो का?
रायपूर : घराचा उंबरठा ओलांडून तिने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली. या घटनांनाही एव्हाना बराच काळ लोटला आहे. पण, चौकटीबाहेरच्या या स्त्रीला खरोखरच आजही प्रतिष्ठा मान, सन्मान मिळतो का?. अनेकांना आत्मपरिक्षण करायला लावणारा हा प्रश्न असला तरी त्याचे काही प्रमाणात उत्तर देण्याचा प्रयत्न छत्तीसगढच्या बालोद जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केला आहे. घरांच्या नेमप्लेटवर मुलींचे नाव टाकत त्यांनी मुलींच्या अस्तित्वाला नवे परिमाण दिले आहे. तर पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत वाढलेल्या या समाजाने परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे नवे पाउलही समजले जात आहे.
समाजात आणि शैक्षणिक वर्तुळात मुलींची ओळख सशक्त व्हावी, हा यामागचा हेतू आहे. स्थानिक प्रशासनाच्या योजनेंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. माओवाद्यांचा काही प्रमाणात प्रभाव असलेल्या बालोद जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी या योजनेची सुरुवात झाली.
बालोदचे जिल्हाधिकारी राजेश सिंह राणा यांनी सांगितले की, समाजात मुलींचे महत्व वाढण्यासाठी आणि मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. बालोद जिल्ह्यातील अनेक गावात आतापर्यंत २,७०० घरांवर मुलींच्या नेमप्लेट लागल्या गेल्या आहेत.
स्थानिक प्रतिनिधी, सरपंच आणि अधिकारी यांच्यात विचार विमर्श झाल्यानंतर पंतप्रधानांची बेटी बचाव, बेटी पढाव ही मोहिम राबविण्यात येत आहे. १२ ग्रामपंचायतींकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (वृत्तसंस्था)
संपूर्ण राज्यात राबविली जावी मोहीम
- एका गावातील अकरावीतील विद्यार्थीनी पेमिना साहू हिने सांगितले की, आमच्यासाठी एक स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. या योजनेमुळे मुलींच्याबाबत गावातील
लोकांची विचारपद्धती बदलत असल्याचे दिसून येत आहे. अन्य एक विद्यार्थीनी जागृति टेकम म्हणाली की, ही मोहीम पूर्ण राज्यात राबविली जावी.
दरम्यान, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी या नेमप्लेट हिरव्या रंगातील आहेत तर पांढऱ्या रंगाने यावर नाव लिहिले आहे. तथापि, या योजनेचा शासकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून विस्तार करण्याचा विचार सुरु आहे.