चीनला इशारा - भारत, अमेरिका व जपानच्या युद्धनौकांचा संयुक्त सराव
By admin | Published: July 5, 2017 01:48 PM2017-07-05T13:48:03+5:302017-07-05T15:10:43+5:30
उद्दामपणा करणा-या चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी आता भारत, अमेरिका आणि जपानसोबत एकत्र आलेत आहे. हे तीन देश चीनविरोधात आपली शक्ती एकत्रितरित्या आजमावणार आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - उद्दामपणा करणा-या चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी आता भारत, अमेरिका आणि जपान एकत्र आले आहे. हे तीन देश चीनविरोधात आपली शक्ती एकत्र आजमावणार आहेत. सिक्किम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका ला प्रदेशात चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेले सुमारे महिनाभर तणातणी सुरू आहे. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती असतानाच पुढील आठवड्यात मोठ्या लष्करी कवायती होणार आहेत. ड्रॅगनची फुत्कार रोखण्यासाठी 10 जुलैपासून केवळ भारतच नाही तर सोबत अमेरिका आणि जपानही भारतीय महासागरातील मलाबार कवायतीमध्ये सहभागी होणार आहेत. सर्व देशांनी स्वतःजवळील उच्च दर्जेच्या युद्धनौका या लष्करी कवायतीसाठी रवानादेखील केल्या आहेत. या त्रिपक्षीय सैन्य युद्धाभ्यासात 15 मोठ्या युद्धनौका, दोन पाणबुड्यांसहीत आणि अनेक लढाऊ विमानं, सर्व्हेलन्स एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभाग घेणार आहेत.
चीनची दक्षिण चिनी सागरी क्षेत्रामध्ये मुजोरी वाढत असून तिला अमेरिका व जपानने विरोध केलेला आहे. हा सगळा भाग आपल्या अखत्यारीत येत असल्याचा चीनचा दावा आहे. तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये चीनने घुसखोरी करू नये आणि आत्तापर्यंत जी परंपरा चालत आली आहे ती पाळावी असा अमेरिकेचा आग्रह आहे. याच हेतूने दक्षिण चिनी सागरामध्ये वहिवाट कायम ठेवण्यासाठी अमेरिकेच्या गस्ती नौका या सागरी प्रदेशात वरचेवर वाहतूक करतात. तर दुसरीकडे जपान आणि चीनचे विळ्याभोपळ्याचे सख्य आहे. या भागामध्ये सदैव वरचश्मा राखलेल्या जपानला आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलाढ्य चीनला जास्त वर डोके काढू देण्याची इच्छा नाही. या पार्श्वभूमीवर भारताबरोबर अमेरिका व जपान नौकादलाच्या संयुक्त कवायती करत आहे, ही अत्यंत महत्त्वाची घटना मानण्यात येत आहे.
चेन्नईच्या समुद्र किना-यापासून काही अंतर दूरवरील जलक्षेत्रात हा युद्धसराव होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत मलाबार युद्धाभ्यास महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण भारत आणि चीनचे सैन्य सिक्किम आणि भुतानजवळच्या सीमाक्षेत्रात आमनेसामने आल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. सिक्किम सीमेवर चीनच्या आक्रमकतेला भारतही त्याच भाषेत प्रत्युत्तर देत असल्याने चीनने आता समुद्रात शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. मागील काही दिवसांत हिंदी महासागरात चिनी युद्धनौकांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून समुद्रातील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष आहे. यावरुन मुजोर चीन आपल्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
तर दुसरीकडे चीन आणि भारतात सुरू असलेल्या तणावादरम्यान व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री व उप पंतप्रधान फाम बिन्ह मिन्ह यांनी मंगळवारी संरक्षणमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. दोन्ही देशलष्करी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी उत्सुक आहेत. यात व्हिएतनाममधील पाणबुड्यांचे प्रशिक्षण आणि या देशाला सैन्य मदतीचाही समावेश आहे. चीनला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारतानं धीम्या गतीनं का होईना पण व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि सिंगापूरसोबत संरक्षण क्षेत्रातील संबंध उत्तम केले आहेत.
44,570 टन वजनाची असलेली आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya) या युद्धनौकेसह भारत सहा ते सात युद्धनौका आणि पाणबुड्यांसहीत मलाबार युद्धाभ्यासात भारत सहभागी होणार आहे. 2013मध्ये नौदलात सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच आयएनएस विक्रमादित्य अशा प्रकारे युद्धाभ्यासात अन्य देशांसहीत सहभागी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेनं आपली एक लाख टन वजन असलेली यूएसएस निमित्ज (USS Nimitz) ही विशाल युद्धनौका रवाना केली आहे. तर जपान 27 हजार टन वजनी हेलिकॉप्टर कॅरीयर इझुमो आणि अन्य काही युद्धनौकांसहीत सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे 9 हेलिकॉप्टर घेऊन जाण्यास सक्षम असलेल्या या जपानी युद्धनौकेचा अॅन्टी सबमराइन वॉरफेअरसाठी (anti-submarine warfare) वापर केला जातो.
दरम्यान, चीन या युद्धाभ्यासामुळे चिंतेत असल्याचे वृत्त आहे. 2007मध्ये चीननं याचा तीव्र विरोधदेखील दर्शवला होता. यावेळी भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरनं मलाबार युद्धाभ्यासात सहभाग घेतला होता.
तर चीनचा मुजोरपणा मोडून काढून त्याला समुद्रात बुडवण्यासाठी भारत, अमेरिका आणि जपान मलाबार युद्धाभ्यासासाठी सज्ज झालेत.