सावधान :15 देशांत पोहोचला मंकीपॉक्स, सावधगिरीच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 08:40 AM2022-05-24T08:40:10+5:302022-05-24T08:40:54+5:30
जागतिक संघटनेचा इशारा, एक रूग्ण आढळला तरी उद्रेक मानला जाईल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना साथीतून जग अद्याप पूर्णपणे बाहेर आलेले नसताना, आता मंकीपॉक्सचे नवे संकट उभे ठाकले आहे. हा आजार केवळ १५ दिवसांत १५ देशांत पसरला आहे. हा आजार आतापर्यंत ब्रिटन, अमेरिका, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड, इस्रायल, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये पसरला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, कोणत्याही देशात या आजाराचा एकही रुग्ण सापडला तरी, तो आजाराचा उद्रेक मानला जाईल. मंकीपॉक्सचे जगात रुग्ण वाढत असताना भारतही सावध झाला आहे.
मंकीपॉक्सची लक्षणे आपोआप कमी होतात. मात्र, लहान मुले आणि गर्भवती महिलांना याचा धोका अधिक असतो. पाच वर्षांपेक्षा लहान मुले या आजाराच्या तडाख्यात लवकर सापडतात. मंकीपॉक्स आजारात ताप, त्वचेवर चट्टे येणे आणि लसिका ग्रंथी सुजणे यासारखी लक्षणे आढळून येतात.
सावधगिरीच्या सूचना
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी अलर्ट जारी केला. आरोग्य मंत्रालयाने विमानतळे, बंदरांच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
युरोपमध्ये रेव्ह पार्ट्यांतून प्रसार
लंडन : युरोपमध्ये नुकत्याच झालेल्या दोन मोठ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये झालेल्या लैंगिक व्यवहारांमुळे त्या खंडातील देशांमध्ये मंकीपॉक्ससारख्या अत्यंत दुर्मीळ आजाराचा प्रसार झाला असण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. डेव्हिड हेमन यांनी म्हटले आहे.