जागतिक मंदीचा इशारा; मोदी घेणार मंत्र्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 07:46 AM2022-09-22T07:46:56+5:302022-09-22T07:47:04+5:30
२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून मोदी हे वर्षातून २ वेळा मंत्र्यांसोबत अशा प्रकारच्या मरॅथॉन बैठका नियमितपणे घेत आले आहेत
हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याचा इशारा जागतिक बँकेने दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले मंत्री आणि सचिवांची एका दिवसभराची मॅराथॉन बैठक घेणार असल्याची माहिती आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांची चर्चा बैठकीत होईल.
याच महिन्यात ही बैठक होणार आहे. आगामी २ वर्षांच्या आत लाेकसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशासमोरील आव्हानांचा आढावा या बैठकीत घेणार आहेत.
२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून मोदी हे वर्षातून २ वेळा मंत्र्यांसोबत अशा प्रकारच्या मरॅथॉन बैठका नियमितपणे घेत आले आहेत. सचिवांसोबतही अशा बैठका ते घेत असतात. सार्वत्रिक निवडणुका १८ महिन्यांवर आल्यामुळे प्राधान्याची क्षेत्रे कोणती असावीत, हा बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे.
सर्व प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेऊन मे २०२४च्या निवडणुकांपूर्वी ते कसे पूर्ण करता येऊ शकतील, यावरही बैठकीत चर्चा होईल. बैठकीची अधिकृत कार्यक्रम पत्रिका मात्र जारी करण्यात आलेली नाही. सहभागितांना अनौपचारिकरीत्या त्याबाबत कळविले जात आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने महागाईच्या नियंत्रणासाठी आणखी उपाययोजना करण्याची तयारी चालविली आहे.