CoronaVirus: तिसऱ्या लाटेचा इशारा, तरीही मास्क वापरण्याबाबत दुर्लक्ष; सर्वेक्षणातील निष्कर्ष, तज्ज्ञ चिंताग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 10:24 AM2021-06-25T10:24:13+5:302021-06-25T10:24:30+5:30
या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, लसीकरण केंद्रांमध्येही मास्क घातलेल्या लोकांचे प्रमाण कमी आढळले.
नवी दिल्ली : देशात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी देऊनही असंख्य लोक मास्क घालताना दिसत नाहीत. लोकल सर्कल्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ६७ टक्के जणांना त्यांच्या भागामध्ये मास्क घातलेले खूपच कमी लोक आढळले. देशातील ३१२ जिल्ह्यांंमध्ये पार पडलेल्या या सर्वेक्षणात ३३ हजार लोकांची मते अजमाविण्यात आली.
या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे की, लसीकरण केंद्रांमध्येही मास्क घातलेल्या लोकांचे प्रमाण कमी आढळले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ३२ टक्के लोकांनी लसीकरण केंद्रात मोठ्या संख्येने लोकांनी मास्क घातले होते असे निरीक्षण नोंदविले आहे. १८ वर्षे वयावरील सर्वांना मोफत लस देण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे विविध लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी होत असून त्यातील बहुतांश लोक मास्क लावत नाहीत.
लसीकरण केंद्रातूनच फैलाव
लसीकरण केंद्रांतूनच आता हा आजार अधिक फैलावू लागल्याने वैद्यकीय तज्ज्ञांना चिंता वाटत आहे. भारतामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग व मृत्यूचे प्रमाण अधिक होते. कोरोनाच्या डेल्टा प्रकारच्या नव्या विषाणूमुळे दुसरी लाट तीव्र स्वरुपाची झाली. मास्क परिधान करणे हा उत्तम प्रतिबंधक उपायांपैकी एक आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. तरीही असंख्य लोक मास्कविनाच फिरत असतात.