कर्णधार धोनीविरुद्ध वॉरंट
By admin | Published: January 9, 2016 03:31 AM2016-01-09T03:31:57+5:302016-01-09T03:31:57+5:30
एका मासिकाच्या मुखपृष्टावर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचे भगवान विष्णूच्या रूपात छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर धोनी चर्चेत आला आहे.
अनंतपूर : एका मासिकाच्या मुखपृष्टावर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचे भगवान विष्णूच्या रूपात छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर धोनी चर्चेत आला आहे. भाविकांच्या भावना दुखावल्यामुळे महेंद्रसिंग धोनी याच्या विरुद्ध आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्हा येथील एका स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
धोनीला न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सध्या तो आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. धोनी आॅस्ट्रेलियामध्ये पाच एकदिवसीय व तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यानंतर भारतात घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर आशिया करंडक स्पर्धा होईल.
२०१३ मधील संबंधित छायाचित्रात धोनीच्या हातात खाण्याच्या विविध वस्तू आहेत. यामध्ये बुटाचा समावेश होता. छायाचित्रामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमठ यांनी तक्रार दाखल केली होती. स्थानिक विश्व हिंदू परिषदचे श्याम सुंदर यांनी याचिका दाखल केली होती.
दरम्यान, भगवान विष्णूच्या रूपातील माझे छायाचित्र काढले नव्हते. तसेच त्या छायाचित्रासाठी मासिकाकडून कोणतेही पैसे घेतले नव्हते, असे धोनीने न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१५ मध्ये धोनीविरोधातील गुन्हेगारी कारवाईची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले होते. (वृत्तसंस्था)