हिंदू राष्ट्रवादामुळे युद्धजन्य परिस्थिती; चीनचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:37 AM2017-07-21T01:37:30+5:302017-07-21T01:37:30+5:30
भारतात हिंदू राष्ट्रवाद वाढत असून, त्यामुळे चीन व भारत यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून
बीजिंग : भारतात हिंदू राष्ट्रवाद वाढत असून, त्यामुळे चीन व भारत यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल टाइम्स, अन्य सरकारी वृत्तपत्रे तसेच सरकारच्या मालकीच्या टीव्ही चॅनलमधून भारतावर सतत टीका केली जात आहे आणि त्यामार्गे भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात हिंदू राष्ट्रवादाचा इंधन म्हणून वापर केला असून, ते सत्तेत आल्यापासून भारतात मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाली आहे, असे नमूद करीत हिंदू राष्ट्रवाद वाढल्यानेच भारत व चीन यांच्यात युद्धाची शक्यता बळावली आहे, असे ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटले आहे.
हिंदू राष्ट्रवादामुळे भारताची युद्धाकडे वाटचाल सुरू आहे. राजधघनी दिल्लीतील परराष्ट्रविषयक सल्लागार, नेते व रणनीती आखणारे चीनविषयीचे भारताचे धोरण बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. पण चीनच्या तुलनेत भारताचे सामर्थ्य खूपच कमी आहे, असा उल्लेख लेखात आहे. डोकलाममधून भारताने आपले लष्कर मागे घ्यावे, असे चीन सातत्याने भारताला सांगत आहे. तरीही आपल्या सैन्याला माघारी न बोलावण्यास भारताची हीच रणनीती कारणीभूत आहे, असा आरोप या लेखात करण्यात आला आहे.
तिबेटची मदत
सुरू राहू द्या
लोकशाही आणि मानवाधिकार टिकवून ठेवण्यासाठी त्या देशाला चीनचा भाग असलेल्या तिबेटला पूर्वीप्रमाणे अर्थसाह्य करण्यात यावे, असे मत तेथील डेमॉक्रेटिक पार्टीच्या सदस्यांनीही व्यक्त केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे साह्य न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्या पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलॉसी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
माघार हाच मार्ग
डोकलाममधून आपले सैनिक मागे घेणे हाच एकमेव मार्ग भारतापुढे आहे. अन्यथा त्या सैनिकांना ताब्यात घेतले जाईल वा ते मारले जातील, असे चीनचे भारतातील माजी वाणिज्यदूत लियो युवफा यांनी म्हटले आहे. युवफा हे मुंबई वाणिज्य कार्यालयात होते.
मला जो आंतरराष्ट्रीय कायदा समजतो, त्याप्रमाणे लष्करी वेषातील व्यक्ती अन्य राष्ट्राच्या सीमेत घुसते, तेव्हा त्या व्यक्तीस शत्रू मानून ताब्यात घेतले जाते वा मारले जाते. त्यामुळे अशा स्थितीत माघार घेणे हाच मार्ग असतो, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेची टीका
वॉशिंग्टन : सतत कुरापती काढण्याची सवय असलेल्या चीनच्या सध्याच्या विस्तारवादी भूमिकेवर अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीच्या संसद सदस्यांनी टीका केली आहे. अन्य राष्ट्रांच्या सीमांबाबतही चीन वाद निर्माण करीत आहे, याचा उल्लेख त्यांनी केला आहे.