'त्या' विमानाच्या मागे होते मोदींचे विमान
By admin | Published: July 18, 2014 11:35 AM2014-07-18T11:35:48+5:302014-07-18T11:36:10+5:30
मलेशियन एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त विमानाच्या मागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही विमान होते अशी माहिती आता समोर येत आहे.
Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७- मलेशियन एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त विमानाच्या मागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही विमान होते अशी माहिती आता समोर येत आहे. मलेशियन विमानाला अपघात झाल्यावर मोदींचे विमान कोणत्या मार्गाने भारतात आणायचे असा प्रश्न होता. मात्र तासाभराने परिस्थिती नियंत्रणात आल्यावर युक्रेनच्या हवाई हद्दीतून हे विमान भारतात आले व सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा श्वास घेतला.
गुरुवारी नरेंद्र मोदी हे ब्राझीलमधील ब्रिक्स देशांची बैठक संपवून मायदेशी परतत होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनमधील टोरेझ परिसरात क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे पाडण्यात आलेल्या मलेशियन विमानाच्या मागेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही विमान होते. एअर इंडियाच्या ००१ या विमानाने फ्रँकफर्ट विमानतळावरुन उड्डाण केले होते. मलेशिया विमान ज्या भागात कोसळले ते टोरेझ शहर फ्रँकफर्टपासून तीन तासांवर आहे. फ्रँकफर्टवरुन उड्डाण घेतल्याच्या तीन तासांनी हे विमान युक्रेनच्या हवाई हद्दीत दाखल होणार होते. मलेशियन विमानाच्या मार्गानेच मोदींचे विमानही जाणार होते.
सुदैवाने मोदींचे विमान फ्रँकफर्टवरुन उड्डाण घेण्यापूर्वीच मलेशिया विमानाला अपघात झाला होता. त्यामुळे आता मोदींचे विमान कोणत्या मार्गाने न्यायचे असा प्रश्न वैमानिकांना पडला होता. रशियाच्या हवाई हद्दीतून किंवा काळा समुद्रावरुन विमान न्यायचे असे पर्याय वैमानिकांसमोर होते. अखेरीस युक्रेन हवाई हद्दीतून विमान भारतात आले व विमानतळार मोदींचे विमान लँड होताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलेशिया विमानाच्या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.