सायकोड्रामा होतं Classroom Wedding?; प्रोफेसर-स्टुडेंट लग्नाचं सत्य बाहेर आलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 10:56 IST2025-02-01T10:55:30+5:302025-02-01T10:56:07+5:30
विशेष म्हणजे १६ जानेवारीला झालेल्या या लग्नाआधी ९ जानेवारीला क्लासरूममध्येच हळदीचा कार्यक्रम घेतला होता आणि १४ फेब्रुवारीला संगीताचा कार्यक्रम होता.

सायकोड्रामा होतं Classroom Wedding?; प्रोफेसर-स्टुडेंट लग्नाचं सत्य बाहेर आलं
पश्चिम बंगाल सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या एका विद्यापीठातील एक व्हिडिओ मागील काही दिवसांपासून खूप व्हायरल होत आहे. त्यात क्लासरूममध्ये महिला प्रोफेसर विद्यार्थ्यासोबत लग्न करताना दिसते. यावेळी क्लासमधील अन्य विद्यार्थी आणि कॉलेजमधील काही स्टाफही हजर असतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. लग्न करणाऱ्या महिला प्रोफेसरला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. आता या घटनेत ट्विस्ट आला आहे.
व्हिडिओत जी प्रोफेसर लग्न करताना दिसत आहे. ती नादियाच्या हरिंगहाटामधील मौलाना अब्दुल कलाम आजाद यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीत सायकोलॉजी विभागाची प्रमुख आहे. या प्रोफेसरचं नाव पायल बॅनर्जी असं आहे. त्या १३ वर्षापासून या क्षेत्रात काम करतात. त्यांनी फर्स्ट ईयरच्या विद्यार्थ्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे १६ जानेवारीला झालेल्या या लग्नाआधी ९ जानेवारीला क्लासरूममध्येच हळदीचा कार्यक्रम घेतला होता आणि १४ फेब्रुवारीला संगीताचा कार्यक्रम होता.
महिला प्रोफेसर काय बोलली?
एका मुलाखतीत प्रोफेसर पायल बॅनर्जी म्हणाल्या की, फ्रेशर्स वेलकम इव्हेंटसाठी हा वेडिंग ड्रामा होता. हा एक प्रकारचा सायकोड्रामा होता, माझ्या विद्यार्थ्यांनी स्वत: मला या नाटकात भाग घ्यावा अशी विनंती केली. अन्य विभागालाही हे माहिती होते तेव्हा कुणीही यावर आक्षेप घेतला नाही. विद्यार्थ्यांनी या इव्हेंटसाठी कार्डही बनवले होते. ई-निमंत्रण पत्रिकाही पाठवल्या होत्या. ज्याने कुणी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, त्याने मला बदनाम करण्यासाठी टाकला. मी या प्रकरणात तक्रार नोंदवणार आहे असं त्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी मुलाखत दिली.
विद्यार्थी काय बोलले?
या प्रकारात विद्यार्थ्यांनी महिला प्रोफेसरची बाजू ठामपणे मांडली. हे काही खरे लग्न नव्हते, केवळ सायकोड्रामा होता असं विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर अनेक वरिष्ठ शिक्षकांनी असा प्रकार करण्याची गरज नव्हती जेव्हा विद्यार्थ्यांचे लग्नाचे वय नव्हते असं सांगत नाराजी व्यक्त केली आहे.