वसुंधरा राजे यांच्यावर दिल्ली झाली नाराज? पंतप्रधान मोदींना भेटण्याची वेळ मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 06:41 AM2023-08-19T06:41:34+5:302023-08-19T06:42:18+5:30
अनेक प्रयत्न केल्यानंतरही वसुंधरा राजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मिळू शकलेली नाही.
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री व दिग्गज नेत्या वसुंधरा राजे यांना राजस्थान विधानसभा निवडणुकीत प्रमुख भूमिका हवी असून, यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना भेटण्याकरिता त्यांनी दिल्लीत ठाण मांडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा वेळ मिळू शकलेला नाही.
राजस्थान भाजप निवडणूक घोषणापत्र समिती व निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नाव न आल्याने माजी मुख्यमंत्री व भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधरा राजे यांनी आपली सर्व शक्ती राजस्थान भाजप निवडणूक मोहीम समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी लावली आहे. याबाबत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यासारख्या नेत्यांची शक्यता जास्त आहे.
वसुंधरा राजे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व भाजपचे संघटन राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्या वेळ मागत आहेत. परंतु हा वेळ अद्याप मिळालेला नाही.
बाजूला सारले?
वसुंधरा राजे यांना राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत मुख्य भूमिका पाहिजे. परंतु भाजपचे केंद्रीय नेतृत्व यासाठी तयार नाही. वसुंधरा राजे यांना राजस्थानच्या बाहेर ठेवण्यासाठी पक्षाने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केले आहे.
अखेरच्या क्षणी टाकला दबाव, मात्र...
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत वसुंधरा यांनी अखेरच्या क्षणी केंद्रीय नेतृत्वावर दबाव टाकून ४० जागांवर आपल्या पसंतीचे उमेदवार घोषित करवून घेतले होते आणि ते सर्व पराभूत झाले होते. त्यामुळे भाजप सत्तेबाहेर गेला. अलीकडेच वसुंधरा राजे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, तेव्हा अमित शाह यांनी त्यांना एवढा आग्रह केला नसता तर राजस्थानमध्ये भाजपचे सरकारच कायम राहिले असते, या बाबीची आठवण दिली.