हे काही आभाळातून नाही आले, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 04:16 AM2019-07-20T04:16:26+5:302019-07-20T04:16:36+5:30
आधुनिक भारताच्या शिल्पकारांच्या नियोजनामुळे भारत आज सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर आरूढ आहे, हे मात्र सोईस्कर विसरतात.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर परखड टीका करणारे स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत कोठे होता? आधुनिक भारताच्या शिल्पकारांच्या नियोजनामुळे भारत आज सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर आरूढ आहे, हे मात्र सोईस्कर विसरतात. २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची होणार असेल, तर पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्या केलेल्या भक्कम पायाभरणीमुळेच. हे काही आभाळातून आले नाही. ब्रिटिशांनी नव्हे तर भारतीयांनी स्वातंत्र्यानंतर यासाठी भक्कम पायाभरणी केली, असे परखड मत व्यक्त करीत माजी राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांंनी काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर आसूड ओढणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब आॅफ इंडियाच्या मालवण सभागृहात गुरुवारी त्यांचे व्याख्यान झाले. अन्य सरकारचेही भारताच्या जडणघडणीत योगदान आहे. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीवर टीका करणाऱ्यांनी हे जरूर ध्यानात घेतले पाहिजे की, स्वातंत्र्याच्या वेळी भारत कोठे होता आणि आम्ही त्याला कोणत्या उंचीवर नेले.
स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्था शून्य होती. आधुनिक भारताच्या शिल्पकारांनी घातलेल्या पायामुळे काँग्रेसच्या राजवटीत भारतीय अर्थव्यवस्था १.८ अब्ज ट्रिलियन डॉलरवर झाली.
सार्वजनिक उपदेश सर्व प्रकारचा हिंसाचार, द्वेषापासून मुक्त असावा. सामाजिक आणि राजकीय विपर्यास आणि भरकटलेपणा टाळण्यासाठी राजकारण आणि जनतेपुढील समस्या समजावून घेण्यासाठी प्रामाणिक संवाद करण्याची गरज आहे.
भारतीय संविधानामुळे विभिन्न धर्म, पंथ, जाती असताना सर्वांसाठी सामाजिक-आर्थिक समानता मिळाली आहे, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
>काँग्रेसनेच रचला भक्कम पाया
भविष्यात ५ ट्रिलियन डॉलरच्या भारतीय अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या भक्कम पाया पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. मनमोहनसिंग आणि नरसिंह राव यांच्यासह आधीच्या सरकारांनी रचला. जवाहरलाल नेहरू आणि इतर धोरणी नेत्यांनी आयआयटी, इस्रो, बँकिंग जाळे आदी स्थापन केल्याने भारताचा विकासाचा वारू चौखूर धावत आहे. डॉ. मनमोहनसिंग आणि नरसिंह राव यांनी रोवलेल्या उदार अर्थव्यवस्थेच्या मुहूर्तमेढेवर भारताचा विकासाचा डोलारा उभारला आहे. याच भक्कम आधारावर विद्यमान वित्तमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरची होईल, असा ठाम दावा करू शकतात, असे प्रणव मुखर्जी म्हणाले.