...तरीही मी चांद्रयान-२ चं लँडिग पाहायला गेलो; मोदींनी सांगितला खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 07:53 PM2020-01-20T19:53:14+5:302020-01-20T21:29:30+5:30
विद्यार्थ्यांच्या मनातली परीक्षेची भीती दूर करण्यासाठी पंतप्रधानांकडून मार्गदर्शन
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अपयशाला घाबरू नका, असा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान मोहिमेदरम्यान घडलेला एक किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला. अपयश आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे अपयशल आल्यास त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही, असं मोदी म्हणाले. दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर हा कार्यक्रम संपन्न झाला.
चांद्रयान मोहिमेदरम्यान मला इस्रोच्या कार्यालयात न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारण चांद्रयानचं लँडिंग यशस्वी होईल, याबद्दल कोणालाही खात्री नव्हती. पण तरीही मी तिथे गेलो, असं मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं. विद्यार्थ्यांच्या मनात असलेली परीक्षेबद्दलची भीती दूर करण्यासाठी 'परीक्षा पे चर्चा'चं आयोजन करण्यात आलं होतं. परीक्षेत चांगले गुण मिळवणं म्हणजे सर्वस्व नाही. परीक्षा म्हणजे सर्व काही या मानसिकतेमधून आपण बाहेर पडायला हवं, असं मोदींनी म्हटलं.
'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींनी २०० विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नव्या तंत्रज्ञानावर भाष्य केलं. नवं तंत्रज्ञान आत्मसात करा. पण त्याच्या आहारी जाऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. 'तंत्रज्ञानावर तुम्ही नियंत्रण ठेवा. ते तंत्रज्ञान तुमच्यावर नियंत्रण ठेवेल, इतका त्याचा वापर करू नका. तंत्रज्ञानामुळे तुमचा वेळ उगाच खर्च होणार नाही, याची काळजी घ्या,' असा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रत्येक घरात एक खोली तंत्रज्ञानमुक्त असायला हवी, असा विचार पंतप्रधानांनी मांडला. घरातली एक खोली गॅजेट्समुक्त असायला हवी, असं मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळायला हवेत, असं त्यांनी म्हटलं. 'दिवसातला कमीत कमी एक तास तंत्रज्ञानमुक्त असायला हवा. त्या वेळेत विद्यार्थ्यांनी मनसोक्त खेळायला हवं. विद्यार्थ्यांनी त्यांचा मोकळा वेळ ज्येष्ठांसोबत घालवायला हवा,' असं मोदींनी सांगितलं. अनेक पालक मुलांना अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची सक्ती करतात. मुलांना अभ्यासेतर उपक्रमांमध्ये गुंतवणं काही पालकांना प्रतिष्ठेचं वाटतं. अशा पालकांनी त्यांचा दृष्टीकोन बदलायला हवा, असं आवाहन मोदींनी केलं.