एसी, फ्रीजसोबत आता वॉशिंग मशीनही महाग; १० टक्क्यांपर्यंत किमती वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:55 AM2022-01-11T08:55:22+5:302022-01-11T08:55:37+5:30
कंपन्यांना खर्च पेलवेना
नवी दिल्ली : नवीन वर्ष सुरू होताच महागाई पुन्हा एकदा ग्राहकांना झटके देऊ लागली आहे. कच्चा माल आणि वाहतुकीसाठी वाढलेल्या खर्चामुळे एसी, फ्रीजसोबतच आता वॉशिंग मशीनच्या किमतीही ५ ते १० टक्क्यांनी वाढणार आहेत.
पॅनासोनिक, एलजी आणि हायर या कंपन्यांनी यापूर्वीच वॉशिंग मशीनच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. तर, सोनी, हिताची, गोदरेज अप्लायन्सेन या कंपन्या मार्चपर्यंत दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सणासुदीमुळे कंपन्यांनी दरवाढ करण्याचे टाळले होते. मात्र, आता खर्चाचा बोझा ग्राहकांवर टाकण्याशिवाय कंपन्यांकडे कोणताही पर्याय नाही. पॅनासोनिकने यापूर्वीच एसीच्या किमतीत ८ टक्क्यांची वाढ केली आहे, असे सीएमाचे अध्यक्ष एरिक ब्रागांजा यांनी म्हटले आहे.
अधिक खर्चामुळे कंपन्या चिंतेत
कंपन्या येत्या तीन महिन्यांमध्ये आपल्या उत्पादनांमध्ये ५ ते १० टक्क्यांनी वाढ करतील. कमोडिटीच्या किमती, जागतिक मालवाहतूक शुल्क आणि कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेली अभूतपूर्व वाढ लक्षात घेऊन आम्ही फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसीच्या किमतीत सरासरी तीन ते पाच टक्क्यांनी वाढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असल्याचे हायर कंपनीचे अध्यक्ष सतीश एनएस यांनी यांनी म्हटले आहे.
‘महागाई टाळणे आता अवघड’
हिताची कंपनीचे अध्यक्ष गुरमीत सिंग म्हणाले, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीमध्ये यापुढे वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही अनेक उपाय करूनही खर्चावर नियंत्रण आणता आलेले नाही. त्यामुळे नाईलाजाने किमतीमध्ये वाढ करावी लागत आहे. कच्चा माल, कर, वाहतूक यामुळे उत्पादन तयार करण्यासाठी अधिक खर्च होत आहे. यामुळे कंपनी एप्रिलपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ करेल. ही वाढ हळूहळू केली जाईल. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.