'विनातिकीट प्रवाशांना दंडाऎवजी रेल्वेतच तिकीट' ही निव्वळ अफवा
By admin | Published: September 6, 2016 10:06 PM2016-09-06T22:06:28+5:302016-09-06T22:06:28+5:30
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणा-यांना रेल्वेतच तिकीट मिळण्याची सोय उपलब्ध करून दिल्याची बातमी ही अफवा आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6- रेल्वेने विनातिकीट प्रवास करणा-यांना रेल्वेतच तिकीट मिळण्याची सोय उपलब्ध करून दिल्याची बातमी ही अफवा आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अशा प्रकारची कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे तुम्ही विनातिकीट रेल्वेतून प्रवास केल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.
सुपरफास्ट रेल्वेमध्ये टीसींकडे अशा प्रकारचं कोणतंही तिकीट मशीन देण्यात आलं नाही. त्यामुळे टीसी तुम्हाला ट्रेनमध्ये कोणतंही तिकीट न देता थेट दंड आकारू शकतो. काही वृत्तपत्रांनी 'रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणा-यांना द्यावा लागणार नाही दंड' या मथळ्याखाली बातमी छापून प्रवाशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रवाशांनी अशा प्रकारच्या कोणत्याही वृत्तावर विश्वास न ठेवता अशा अफवांपासून शक्यतो दूर राहावे आणि तिकीट काढूनच रेल्वेतून प्रवास करावा.
रेल्वेचे पीआरओ विभागाचे अतिरिक्त महासंचालक अनिल सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही निर्णयाची घोषणा केली नाही. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच काही वृत्तपत्रांनी लखनऊ मेल, गरीब रथ, अर्चना सुपरफास्ट, राजधानी सुपरफास्ट या रेल्वेमध्ये टीसींना हँड-हेल्ड मशीन देण्यात आल्याचंही वृत्त दिलं होतं. मात्र तशा प्रकारचं कोणतंही मशीन टीसींना देण्यात आलं नाही, अशी माहिती अनिल सक्सेना यांनी दिली आहे. त्यामुळे वाचकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.