विधानसभेत अश्लील व्हिडिओ बघणे राष्ट्रविरोधी कृत्य नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 06:59 AM2019-09-07T06:59:36+5:302019-09-07T07:00:17+5:30
कर्नाटकच्या कायदामंत्र्यांचे तर्कट; उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी केले समर्थन
बंगळुरू : विधानसभेत अश्लील (पॉर्न) व्हिडिओ बघणे हे राष्ट्रविरोधी कृत्य नाही, असे अजब तर्कट कर्नाटकचे कायदा व संसदीय कामकाजमंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी लढविले आहे. विधानसभेमध्ये मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ बघत असल्याबद्दल विद्यमान उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांना २०१२ साली मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
सावडी यांच्या समर्थनार्थ मधुस्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे. लक्ष्मण सावडी यांना उपमुख्यमंत्री केल्यामुळे कर्नाटकमध्ये सुरू झालेले वादंग लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या सावडी यांना उपमुख्यमंत्री केल्याबद्दल भाजपला काही लाजशरम वाटते का, असा परखड सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकताच केला होता.
त्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मधुस्वामी म्हणाले की, पॉर्न व्हिडिओ पाहणे नैतिकदृष्ट्या चुकीचेच आहे. विधानसभेत सावडी यांच्याकडून असा व्हिडिओ चुकून पाहिला गेला.
आपल्या सर्वांच्या हातून चुका होत असतात. मात्र, एखाद्याने केलेल्या चुकीमुळे त्याच्यावर सतत टीका करणे चांगले नाही. लक्ष्मण सावडी यांनी कोणाची फसवणूक केलेली नाही किंवा त्यांच्या हातून एखादे राष्ट्रविरोधी कृत्य घडलेले नाही की ज्यामुळे त्यांना शिक्षा केली
जावी.
अमित शहा आमच्यापेक्षा बुद्धिमान
च्कर्नाटकचे कायदामंत्री मधुस्वामी म्हणाले की, मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी लक्ष्मण सावडी यांच्याकडे असलेले संघटना कौशल्य लक्षात घेऊनच त्यांना उपमुख्यमंत्री केले आहे.
च्महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सावडी यांच्या संघटन कौशल्याचा भाजपला खूप मोठा फायदा झाला होता. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आम्हा सर्वांपेक्षा बुद्धिमान आहेत. कोणाचा कुठे व कधी नेमका वापर करून घ्यायचा, हे त्यांना चांगले कळते.