‘काझीरंगा’त पाणी शिरले; २३ प्राण्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:52 AM2019-07-17T04:52:56+5:302019-07-17T04:53:11+5:30

आसाममध्ये महापुरामुळे ४३० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील ९० टक्के भागात पाणी शिरले आहे.

Water came in 'Kaziranga'; 23 animal deaths | ‘काझीरंगा’त पाणी शिरले; २३ प्राण्यांचा मृत्यू

‘काझीरंगा’त पाणी शिरले; २३ प्राण्यांचा मृत्यू

Next

गुवाहाटी : आसाममध्ये महापुरामुळे ४३० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील ९० टक्के भागात पाणी शिरले आहे. गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यातील सर्व प्राणी या जलप्रलयापासून जीव बचावण्याकरिता उंच जागी जाण्याची धडपड करीत आहेत. मात्र, या प्रयत्नात शनिवारपासून आतापर्यंत २३ प्राणी मरण पावले आहेत.
आसाम आणि बिहारमध्ये पुराने कहर केला असून पूर आणि संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात मुसळधार पावसाने आतापर्यंत १४ लोकांचा बळी घेतला आहे.
सुरक्षित जागी जाण्यासाठी प्राणी करत असलेला प्रवासही धोकादायक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३७ चा सुमारे ६० किमीचा पट्टा हा काझीरंगा अभयारण्यातून जातो. या महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला उंच ठिकाणी कारबी अँगलाँगचा जिल्ह्याचा परिसर आहे. काझीरंगातील हत्ती, हरणे मोठ्या संख्येने हा महामार्ग ओलांडून कारबी अँगलाँगमध्ये जात आहेत. या अभयारण्याला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो. त्यामुळे मोठे नुकसान होते. काझीरंगातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील हलक्या वजनाच्या वाहनांची वाहतूक नागाव जिल्हा प्रशासनाने तात्पुरती थांबविली आहे. अभयारण्यातील प्राणी महामार्ग ओलांडून ज्या मार्गाने कारबी अँगलाँगला जात आहेत त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिरिक्त १०० वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. या प्राण्यांना विनाअडथळा तेथून जाता यावे व तसेच गेंड्यांसह इतर प्राण्यांची कोणी अवैध शिकार करू नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे. याच मार्गावरून जाताना काही प्राणी मरण पावले आहेत. (वृत्तसंस्था)
>मोठ्या संख्येने गेंडे, रानम्हशी अडकल्या
आसाम सरकारचे जलस्रोत खात्याचे मंत्री केशब महंत यांनी सांगितले की, काझीरंगा अभयारण्यामध्ये असलेल्या उंच ठिकाणांमुळे तेथील प्राण्यांचा जीव बचावण्यास मदत झाली आहे. तेथील परिस्थितीवर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहे व लागेल ती मदत तात्काळ पुरविण्यात येत आहे. काझीरंगा अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापुरामुळे या अभयारण्यात मोठ्या संख्येने गेंडे व रानम्हशी अजूनही अडकलेल्या आहेत.
>आसामला सर्वतोपरी मदत : मोदी
गुवाहाटी : आसाममधील सध्याच्या पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून घेऊन ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. राज्यात पूर आणि दरडी कोसळून १५ जणांचे प्राण गेले असून, ४६ लाख लोकांना फटका बसला आहे.
राज्यातील ३० जिल्ह्यांतील पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती सोनोवाल यांनी मोदी यांना दिली, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे. आसामच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अधिकाºयाने सांगितले की, सोमवार दुपारपर्यंत ४,१७५ खेड्यांतील ४६.२८ लाख लोकांना व जवळपास ९० हजार हेक्टर्सवर शेतजमिनीला फटका बसला आहे. काही शेतात तर पीकही उभे होते. पूरग्रस्त भागात लोकांना मदत आणि साह्यासाठी सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यांत लष्करालाही बोलावले आहे. १० लाखांपेक्षा जास्त प्राण्यांनाही पुराचा फटका बसला आहे.

Web Title: Water came in 'Kaziranga'; 23 animal deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर