अफगाणिस्तानच्या मुलीने पाठवले पाणी, त्याच पाण्याने योगींच्या हस्ते रामललाचा अभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 05:20 PM2021-10-31T17:20:33+5:302021-10-31T18:51:09+5:30
अफगाणिस्तानातील एका मुलीने रामजन्मभूमीवर अर्पण करण्यासाठी काबुल नदीचे पाणी पाठवले होते, त्याच पाण्याने अभिषेक करण्यात आला.
अयोध्या: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी अफगाणिस्तानमधील काबूल नदीच्या पाण्याने रामजन्मभूमीचा अभिषेक केला. हे पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगाणिस्तानातील एका मुलीने पाठवले होते. या पाण्याने प्रभू रामाचे जन्मस्थान पवित्र करावे, अशी विनंती तिने पंतप्रधानांना केली होती. त्यानुसार योगींनी या पाण्याने रामजन्मभूमीचा अभिषेक केला. यावेळी योगींनी भगवान श्री राम आणि हनुमानगडीचे दर्शन घेतले. तसेच, 3 नोव्हेंबरला होणाऱ्या दीपोत्सवाच्या तयारींचा आढावाही घेतला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्या अफगाणी मुलीच्या आणि कुटुंबाच्या भावनेचा आदर करत मी हे पाऊल उचलत आहे. अफगाणिस्तानातील अशांततेनंतरही लोक आपली संस्कृती विसरलेले नाहीत. काबूलमधील मुलीने पाणी पाठवले हे तर कौतुकास्पद आहेच. सध्या काबूलमध्ये भीषण परिस्थिती आहे, अशा परिस्थितीतही त्या मुलीने हे पाणी पाठवले आहे, तिच्या कुटुंबाला शुभेच्छा.
यंदा कशी असेल अयोध्यातेल दिवाळी ?
या वर्षी दिपोत्सवाची सुरुवात 1 नोव्हेंबरला होईल आणि शेवट 5 नोव्हेंबरला होईल. अयोध्येत रामजन्मभूमीपासून 15 किलोमीटरचा परिसरात दिवे आणि रांगोळ्यांनी सुशोभित केला जाईल. यंदा 9 लाख दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या दिवशी गायक अनुप जलोटांचा कार्यक्रम असेल. त्याच दिवसी जनकपूर नेपाळची रामलीला असेल. यंदा परदेशी रामलीलांमध्ये श्रीलंका आणि नेपाळच्या रामलीलेचे सादरीकरण होईल. तर, जनकपूर, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पश्चिम बंगाल, असाम, दिल्ली आणि अयोध्येतील रामलीलांचे मंचन होईल. यासह इतर दिवशीही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.