कर्नाटकातून तामिळनाडूला पाणी देणे सुरू
By admin | Published: September 8, 2016 05:11 AM2016-09-08T05:11:44+5:302016-09-08T05:11:44+5:30
कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तमिळनाडुला कावेरी नदीचे पाणी सोडण्यास बुधवारी प्रारंभ करताच राज्यात त्याच्या निषेधार्थ निदर्शनेही वाढू लागली आहेत.
बंगळुरू : कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तमिळनाडुला कावेरी नदीचे पाणी सोडण्यास बुधवारी प्रारंभ करताच राज्यात त्याच्या निषेधार्थ निदर्शनेही वाढू लागली आहेत. स्वत: कर्नाटक पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड देत असूनही हे पाणी सोडणे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार सरकारला ‘अपरिहार्य’ होते, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
कावेरी नदीच्या खोऱ्यातील चार जलसाठ्यांमध्ये जिवंत पाणीसाठा ४६.७ टीएमसी फूट आहे. त्या जलसाठ्यांची हा साठा धारण करण्याची क्षमता १०४ टीएमसी फुटांची आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी अवघड बनली आहे. त्यामुळे दहा दिवसांसाठी १५ हजार क्युसेक्स पाणी सोडण्याच्या आदेशात दुरुस्ती करावी, अशी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करू, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे कर्नाटकसाठी अपरिहार्य व घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर लगेचच मंगळवारी रात्रीपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.