Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 10:35 AM2024-06-18T10:35:40+5:302024-06-18T10:45:33+5:30

टँकर आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी केली होती. पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

water shortage in many areas of delhi people are breaking down on seeing the tanker video | Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी

Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी

दिल्लीतील जनता पाणी टंचाईच्या भीषण संकटाचा सामना करत आहे. पाण्यावरून राजकारण होत आहे. भाजपा आणि काँग्रेसचे नेते दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारला कोंडीत पकडत आहेत आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यात उदासीन असल्याचा आरोप करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, दिल्लीतील अनेक भागात टँकर दिसताच लोक पाण्यासाठी मोठी गर्दी करतात. व्हिडीओ पाहून भीषण परिस्थितीचा अंदाज येतो.

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या प्रचंड उकाडा आहे. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत उष्णतेने होरपळत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक आणखी त्रस्त आहेत. उष्णता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा हवामानामुळे दिल्ली-एनसीआरमधील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. देशाच्या राजधानीतही पाण्याची टंचाई जाणवत आहे. गीता कॉलनी, वसंत विहार, ओखला अशा अनेक भागात तीव्र पाणीटंचाई आहे. येथे टँकर दिसताच लोक तुटून पडत आहेत.

सध्या दिल्लीतील गीता कॉलनी भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलसंकटामुळे स्थानिक नागरिक चिंतेत आहेत. याठिकाणी टँकर आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी केली होती. पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिल्लीतील स्थानिक लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे वसंत विहार परिसरातील कुसुमपूर पहाडी येथील लोकांनाही पाणी संकटाचा सामना करावा लागत असून ते टँकरवर अवलंबून दिवस काढत आहेत. येथे टँकर येताच पाण्यासाठी झुंबड उडते.

दिल्लीतील जलसंकटासाठी भाजपाने आम आदमी पक्षाच्या सरकारला जबाबदार धरले आहे. विविध भागात भाजपा पुन्हा रस्त्यावर उतरला. खासदार मनोज तिवारी यांनी मुखर्जी नगरमध्ये निदर्शने करत दिल्ली सरकारच्या गलथान कारभारामुळे पाण्याचे संकट असल्याचा आरोप केला. आंदोलकांनी दिल्ली बोर्डाच्या कार्यालयासमोर मडकी फोडून संताप व्यक्त केला.

मनोज तिवारी यांनी जलमंत्री आतिशी यांच्यावर दिल्लीच्या पाण्याबाबत खोटं बोलल्याचा आरोप केला. शहरातील ५५ टक्के पाणी वाया जात असल्याचा दावा करत सरकार टँकर माफियांना पाणी विकत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाचे खासदार मनोज तिवारी, बांसुरी स्वराज, रामवीर विधुरी, प्रवीण खंडेलवाल आणि योगेंद्र चंदौलिया यांनी डीजेबीच्या विविध कार्यालयांमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला.


 

Web Title: water shortage in many areas of delhi people are breaking down on seeing the tanker video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.