कर्नाटकला भेडसावणार यंदा भीषण पाणीटंचाई
By admin | Published: October 13, 2016 04:51 AM2016-10-13T04:51:05+5:302016-10-13T04:51:05+5:30
पश्चिम घाटातील नद्या आताच कोरड्या पडल्या असून, पुढच्या मान्सूनला अजून बराच अवकाश असल्यामुळे आगामी काळ कर्नाटकसाठी अत्यंत खडतर
बंगळुरू : पश्चिम घाटातील नद्या आताच कोरड्या पडल्या असून, पुढच्या मान्सूनला अजून बराच अवकाश असल्यामुळे आगामी काळ कर्नाटकसाठी अत्यंत खडतर राहू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कावेरी तंट्यावरील तोडग्याबाबत अनिश्चितता असली तरी येणारा उन्हाळा कर्नाटकसाठी भीषण राहील याबाबत पर्यावरणतज्ज्ञांमध्ये अजिबात दुमत नाही.
पश्चिम घाटातील नद्या आताच कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकला आतापर्यंतच्या सर्वात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, असे पर्यावरणतज्ज्ञ दिनेश होल्ला यांनी सांगितले. होल्ला हे ‘सह्याद्री संचय’ संस्थेचे समन्वयक आहेत. ही संस्था पश्चिम घाटाच्या संवर्धनाचे कार्य करते. नेत्रावती आणि तिच्या उपनद्यांमध्ये फारच थोडे पाणी उरल्याचे पाहून आपल्याला धक्काच बसला, असे ते म्हणाले. आम्ही गेल्या २२ वर्षांपासून गिर्यारोहण करीत असून हा भाग आणि तेथे होत असलेल्या पर्यावरणीय बदलाची आम्हाला चांगली कल्पना आहे. सह्याद्री संचयतर्फे दरवर्षी पावसाळी गिरीभ्रमण आयोजित करण्यात येते. पश्चिम घाटात उगम पावणारी नेत्रावती नदी आणि तिच्या नऊ उपनद्या आणि ४२ ओहळ आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान ओसंडून वाहत असतात; परंतु यावेळी हे चित्र नाही. एरवी धो धो वाहणारे नेत्रावतीचे धबधबे यंदा लक्षणीयरीत्या क्षीण झाले आहेत.
पश्चिम घाटात सध्या जानेवारी-मार्चदरम्यान असते तशी परिस्थिती आहे. यावर्षी पहिल्यांदाच दक्षिण कन्नड जिल्हाही पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरा जातोय. पुढच्या मान्सूनपर्यंतचा काळ केवळ जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी भीषण ठरणार आहे,
असा इशारा होल्ला यांनी दिला. सह्याद्री संचयच्या पथकाने मृत्युंजय नदीच्या काठावरील मधुगुंडी भागात अलीकडेच गिरीभ्रमण केले. चारमदी घाटातील मृत्युंजय नदी नेत्रावतीची उपनदी आहे. (वृत्तसंस्था)