बोगद्यात पाणी थांबणार नाही; रेल्वेचे नवे तंत्र, जम्मू-काश्मीरमध्ये प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 09:03 AM2023-10-24T09:03:13+5:302023-10-24T09:03:30+5:30
१११ किमी लांबीच्या कटरा-बनिहाल विभागात बोगदे बांधण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीनगर :भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांनी काश्मीर रेल्वे लिंक प्रकल्पाच्या १११ किमी लांबीच्या कटरा-बनिहाल विभागात बोगदे बांधण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यात बोगद्याच्या खोदकामादरम्यान पाण्याच्या प्रवाहाला सामोरे जाण्यासाठी आगाऊ तयारी केली जाते, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाच्या कटरा-रियासी विभागात त्रिकुटा डोंगराच्या पायथ्याशी असलेला ३.२ किमी लांबीचा ‘सिंगल ट्यूब’ बोगदा प्रकल्पाचा सर्वात कठीण भाग म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रियन बोगदा पद्धतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या जाळीच्या गर्डर पद्धतीऐवजी आयएसएचबी तंत्रज्ञानाचा वापर केल्याने बोगदा अधिक मजबूत होतो. त्यासाठी पर्वतांमध्ये ९ मीटरचे पाइप टाकले जातात, त्यास ‘पाइप रूफिंग’ म्हटले जाते.