रद्द नोटा जमा करण्याचा मार्ग कायमचा बंद!, अर्थ सचिवांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 02:25 AM2017-09-01T02:25:39+5:302017-09-01T02:25:59+5:30
केंद्र सरकार यापुढे नोटाबंदीच्या निर्णयाने रद्द करण्यात आलेल्या ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही नवी खिडकी उघडणार नाही, असे गुरुवारी अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले.
नवी दिल्ली : केंद्र सरकार यापुढे नोटाबंदीच्या निर्णयाने रद्द करण्यात आलेल्या ५00 व १000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही नवी खिडकी उघडणार नाही, असे गुरुवारी अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले.
रिझर्व बँकेने बुधवारी सादर केलेल्या वार्षिक अहवालानुसार, नोटाबंदीने रद्द केलेल्या ९९ टक्के नोटा विविध बँकांमध्ये नियोजित कालावधीत जमा झाल्या आहेत. १६ हजार ५0 कोटी रुपयांच्या ज्या उर्वरित नोटा बँकेत जमा झालेल्या नाहीत त्या यापुढे जमा होण्याची अथवा नव्या चलनात बदलून मिळण्याची शक्यता नाही, असा खुलासा अर्थ खात्याचे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव एस.सी. गर्ग यांनी केला.
नोटाबंदीनंतर महाराष्ट्रातल्या सहकारी बँकांमध्ये जमा झालेली जुन्या नोटांमधील बरीच रक्कम दीर्घकाळ पडून पडून होती. भारतीय चलनी नोटा भूतान, नेपाळसारख्या देशात व्यवहारात असतात. नोटाबंदीनंतर या देशांकडून जुन्या नोटा रिझर्व बँकेत जमा होणे बाकी होते.
जमा झालेल्या ९९ टक्के नोटांमध्ये त्यांचा समावेश आहे की नाही, त्याचा खुलासा अद्याप झालेला नाही. तथापि रद्द केलेल्या नोटा बदलून देण्यासाठी यापुढे कोणतीही खिडकी उघडली जाणार नाही, हे अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव एस.सी. गर्ग यांनी स्पष्ट केले असल्याने या विषयावर कायमचा पडदा पडला आहे.
केंद्र सरकारला अर्थसंकल्प तयार करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रिझर्व बँकेने आर्थिक वर्ष २0१६-१७साठी ४४ हजार कोटींचा सरप्लस डिव्हिडंड अपेक्षित धरला होता. मात्र ३0 हजार ६५९ कोटींची रक्कम डिव्हिडंड म्हणून केंद्र सरकारकडे वर्ग केली.