तामिळनाडूच्या पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर
By admin | Published: December 6, 2015 03:31 AM2015-12-06T03:31:01+5:302015-12-06T03:31:01+5:30
तामिळनाडूतील पूरग्रस्त क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून चेन्नईत शनिवारी दूरसंचार आणि रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. रस्त्यावरील वाहतूकही रुळावर येत आहे.
चेन्नई : तामिळनाडूतील पूरग्रस्त क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून चेन्नईत शनिवारी दूरसंचार आणि रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. रस्त्यावरील वाहतूकही रुळावर येत आहे. परंतु काही भागात अजूनही पाणी साचले आहे.
दरम्यान लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी आज शहर आणि त्यालगतच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली आणि प्रशासनाला गरज वाटेल तोपर्यंत लष्कराचे बचाव अभियान सुरूच राहील, असे आश्वासन दिले. सरकारच्या माहितीनुसार १ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने किमान २४५ लोकांचा बळी घेतला.
मंगळवारी शहरातील काही भागात पूर आल्याने परिस्थिती चिघळली होती. पुरामुळे रस्ते, रेल्वेमार्ग उद्ध्वस्त झाले तर विमानतळही बंद करावे लागले होते. विद्युत आणि दूरध्वनी सेवा ठप्प पडून लाखो लोक अडकले होते.
कोट्टापुरम, मुदीचुर आणि पल्लीक्करनईसारखे अनेक भाग अजूनही पाण्याखालीच असून असंख्य नागरिक घरांच्या छतावर आश्रयाला आहेत. दरम्यान शहरातील काही एटीएम आणि पेट्रोलपंप सुरू झाले असून तेथे लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. इंधन पुरवठा पुढील दोन दिवसात सामान्य होईल तसेच रविवारी राज्यांमधील बँका सुरू राहतील,अशी ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. (वृत्तसंस्था)
एनडीआरएफने १६,००० लोकांना वाचविले
तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि राज्याच्या अन्य भागात आलेल्या पुरात मदत आणि बचाव मोहिमेअंतर्गत एनडीआरएफने आतापर्यंत १६,००० वर लोकांचे जीव वाचविले असल्याचे दलातर्फे सांगण्यात आले. दलाच्या २०० नौकांसह ५० पथके बचाव कार्य करीत आहेत.
दलाचे महासंचालक ओ.पी. सिंग यांनी सांगितले की, २० नवी पथके बचाव कार्यात सहभागी करण्यात आली असून जवळपास १६०० जवान हे कार्य करीत आहेत.
लष्कराने ५,५०० लोकांना सुरक्षितस्थळी हलविले
लष्कराने आतापर्यंत ५,५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असून तांब्रम, उरापक्कम, मन्निवक्कम, मुदीचेऊर आणि इतर क्षेत्रात लष्कराची ५० पथके बचाव कार्यात सहभागी झाली आहेत.
विमानतळावरून तांत्रिक उड्डाणे सुरू
पुरात वेढलेल्या चेन्नई विमानतळावरून तांत्रिक उड्डाणे सुरू झाली आहेत. पुरामुळे येथील हवाई वाहतूक बुधवारपासून बंद होती. प्रवासी विमानसेवा सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिली.विमानतळाच्या तळघरात अजूनही पाणी साचले असून टर्मिनल इमारतीतील विद्युत पुरवठा अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही.