८00 इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद पडण्याच्या मार्गावर, एआयसीटीई अध्यक्षांनीच दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:54 AM2017-09-03T00:54:19+5:302017-09-03T00:54:57+5:30
देशभरातली सुमारे ८00 अभियांत्रिकी बंद करण्याची इच्छा आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) व्यक्त केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ५९ महाविद्यालयांचा समावेश आहे.
बेंगळुरू : देशभरातली सुमारे ८00 अभियांत्रिकी बंद करण्याची इच्छा आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) व्यक्त केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ५९ महाविद्यालयांचा समावेश आहे. या संस्थांमधील विद्यार्थी प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही पुरेशा प्रमाणात भरल्या जात नाहीत, असे आढळून आले आहे.
एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी देशभरातील सुमारे ८00 महाविद्यायले बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे. दरवर्षी सुमारे १५0 अभियांत्रिकी महाविद्यालये एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेत. ज्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात आणि
सलग पाच वर्षे ज्या महाविद्यालयांतील ३0 टक्क्यांहून अधिक जागा
भरल्या जात नाहीत, ती बंद करायला हवीत, असा एआयसीटीईचा नियमच आहे.
बेंगळूरूमध्ये एका कार्यक्रमात अनिल सहस्त्रबुद्धे यांनी ही माहिती दिली आहे. एआयसीटीईच्या वेबसाइटनुसार २0१४-१५ ते २0१७-१८ या काळात देशातील सुमारे ४१0 अभियांत्रिकी महाविद्यालयांना बंद करण्याची संमती देण्यात आली.
त्यात कर्नाटकातील २0 आहेत. सन २0१६-१७ मध्ये सर्वाधिक
अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्यात आली. (वृत्तसंस्था)
दर्जा नसलेल्याचा परिणाम...
कॉलेज बंद पडणा-यांत तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरयाणा, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. काहींनी टप्प्याटप्प्याने महाविद्यालये बंद करण्याची परवानगी एआयसीटीईकडे मागितली आहे.
ज्या संस्थाचालकांना अभियांत्रिकी महाविद्यालये चालवता येत नाही, त्यांना ती टप्प्याटप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतात किंवा कॉलेजचे रूपांतर पॉलीटेक्निक किंवा विज्ञान वा कला महाविद्यालयात करतात. टप्प्याटप्प्याने बंद करणे म्हणजे प्रथम वर्षात प्रवेश देणे बंद करणे परंतु प्रवेश घेतलेल्या आधीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांचे शिक्षण घेण्याची सोय सुरू ठेवणे
महाविद्यालयांचा दर्जा, तेथील शिक्षणाचा नोकरीसाठी होणारा उपयोग ही महत्त्वाची आव्हाने आहेत. प्राध्यापकांचे कौशल्य हाही चिंतेचा विषय आहे. पुरेसा अनुभव नसलेले प्राध्यापक अनेक ठिकाणी शिकवतात. थेट उद्योगांमध्ये काम करण्यास पात्र ठरू शकतील, असे अभियंते घडवणे हे एआयसीटीईचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
बंद होणारी महाविद्यालये
तेलंगणा 65
महाराष्ट्र 59
उत्तर प्रदेश47
तामिळनाडू31
हरयाणा31
राजस्थान 30
आंध्र प्रदेश29
गुजरात29
कर्नाटक 21
मध्य प्रदेश 21
पंजाब19