VIDEO: पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपचा प्रचंड गदारोळ; ममतांनी घेतली राज्यपालांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 08:26 PM2022-03-07T20:26:35+5:302022-03-07T20:27:14+5:30
धनखड यांनी कारवाई सुरू होऊ द्यावी, असे म्हणत भाजप आमदारांना दोन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप आमदारांनी त्यांचे ऐकले नाही.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (सोमवार), राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील कथित हिंसाचाराविरोधात भाजप आमदारांनी जोरदार निषेध केला. यामुळे राज्यपाल जगदीप धनखड यांना आपले अभिभाषण करता आले नाही. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या आणि असा प्रकार लोकशाहीसाठी लाजिरवाणा असल्याचे म्हणाल्या. यानंतर ममता यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.
सभागृहात भाजप आमदारांचा गदारोळ -
राज्यपाल दुपारी 2 वाजता सभागृहात पोहोचले. मात्र त्यांना आपले अभिभाषण देता आले नाही. कारण भाजप आमदार महानगर पालिका निवडणुकीतील हिंसाचारातील कथित पीडित लोकांचे फोटो आणि पोस्टर्स घेऊन थेट आसनापर्यंत पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. धनखड यांनी कारवाई सुरू होऊ द्यावी, असे म्हणत भाजप आमदारांना दोन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप आमदारांनी त्यांचे ऐकले नाही. निषेध करत असलेल्या सदस्यांनी सभागृहातच ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या.
#WATCH | A ruckus erupted inside West Bengal Legislative Assembly as opposition protested against alleged rigging and violence in the state's civic polls. pic.twitter.com/1EwPVJIbrp
— ANI (@ANI) March 7, 2022
यानंतर, राज्यपाल सभागृहातून बाहेर पडू लागताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यांना थांबण्याचे आवाहन केले. यानंतर धनखड यांनी पुन्हा एकदा भाजप सदस्यांना शांत होण्याचे आणि कामकाज चालू देण्याची विनंती केली, मात्र भाजप सदस्यांनी ऐकले नाही. यावर, टीएमसी सदस्यांनीही दुपारी 2.26 वाजताच्या सुमारास भाजपविरोधी घोषणा बाजीला सुरुवात केली.
धनखड यांच्या शिवाय, विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनीही सदस्यांना सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले, पण याचाही काहीच परिणाम झाला नाही. दरम्यान, यानंतर ममता बॅनर्जी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.