"आम्ही मंगळ आणि शुक्रावर जाण्यासाठी सक्षम, पण..," इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 12:50 PM2023-08-27T12:50:32+5:302023-08-27T12:51:08+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्रयान ३ चं यशस्वीरित्या लँडिंग केलं. अंतराळ संस्था पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्रयान ३ चं यशस्वीरित्या लँडिंग केलं. अंतराळ संस्था पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. आता आदित्य एल-१ मिशन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केलं जाईल. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. तारीख लवकरच जाहीर केली दाणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी शनिवारी दिली. ते प्रक्षेपित करण्याचे इस्रोचे पुढील लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
"भारत अधिक इंटर प्लॅनेटरी मिशन्स सुरू करण्यास सक्षम आहे. अंतराळ क्षेत्राच्या विस्ताराद्वारे देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा एक भाग बनण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे," असं एस सोमनाथ म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाच्या अंतराळ क्षेत्राबाबत दीर्घकालीन दृष्टीकोन आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी इस्रो पूर्णपणे तयार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. चंद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर एस सोमनाथ शनिवारी संध्याकाळी प्रथमच केरळची राजधानी थिरुआनंतपुरम येथे गेले होते.
१०० टक्के यश हवं
केवळ सॉफ्ट लँडिंग हा आमचा उद्देश नाही. चंद्रयान ३ सर्वच बाबींवर १०० टक्के यशस्वी झाले पाहिजे यावर आमचं लक्ष आहे. संपूर्ण देशाला याचा अभिमान आहे आणि आम्हाला समर्थनही मिळत आहे. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा भाग बनल्याचा आम्हाला अभिमान आहे. लोकांचा पाठिंबा यापुढेही कायम राहावा अशी अपेक्षाही इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी व्यक्त केली.
आदित्य एल १ होणार लाँच
यावेळी त्यांना आदित्य-एल १ बद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. "हा उपग्रह तयार करण्यात आला आहे आणि श्रीहरिकोटा येथे पोहोचला आहे. आदित्य एल १ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे आणि दोन दिवसात तारीख जाहीर केली जाईल. प्रक्षेपणानंतर, पृथ्वीपासून लॅग्रेंज पॉइंट १ (L1) पर्यंत पोहोचण्यासाठी १२५ दिवस लागतील. तोपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल," असं ते म्हणाले.