We are Hiring; भल्याभल्यांना मंदीचा मार, 'ही' कंपनी 9000 पदं भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 05:31 PM2019-09-18T17:31:54+5:302019-09-18T17:33:04+5:30
Coal India Government Job : एग्झिक्युटिव्ह स्तरावरील 4,000 पदांची नियुक्ती
कोलकाता : आर्थिक मंदीचा फटका बसल्यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. मात्र एक अशी सरकारी कंपनी आहे की तिने बंपर नोकर भरती करण्याचे नियोजन केले आहे. कोल इंडिया असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी जवळपास 9,000 पदांची नोकर भरती करणार आहे. यामध्ये कंपनी एग्झिक्युटिव्ह स्तरावरील 4,000 पदांची नियुक्ती केली जाणार आहे.
सरकारी खनिज कंपनी कोल इंडिया आणि या कंपनीच्या सब्सिडियरीजद्वारे होणारी ही भरती गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी आहे. एग्झिक्युटिव्हची नियुक्ती होल्डिंग कंपनीत होत असते. कामगार आणि टेक्निकल नोकरदारांना कंपनीच्या आठ सहाय्यक युनिट्समध्ये नियुक्त केले जाते.
गेल्या 10 वर्षांत कोल इंडिया पहिल्यांदाच इतकी मोठी भरती करत आहे. अनेक वर्षांपासून या जागांवर नोकर भरती करणे बाकी होते. गेल्या वर्षात आम्ही फक्त 1,200 जागांवर नोकर भरती केली होती, असे कोल इंडिया कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.
जगभरातील सर्वात मोठी कोळसा उत्पादन कंपनी म्हणून कोल इंडियाला ओखळले जाते. कोल इंडिया कंपनीत 2,80,000 कर्मचारी आहेत. यामध्ये जवळपास 18,000 एग्झिक्युटिव्ह पदावर आहेत.
नियुक्ती केल्या जाणाऱ्या 4,000 कर्माचाऱ्यांमधील ज्युनिअर वर्गातील 900 पदांची नियुक्ती जाहिरात आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 400 पदांची भरती कॅम्पसद्वारे आणि 100 मेडिकल ऑफिसर आदी पदासांठी नियुक्ती केली जाणार आहे. 75 पदांसाठी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, 2,200 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची निवड स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.