'भ्रष्टाचार केल्यास तुरुंगात टाकत आहोत, म्हणून ते चिंतित'; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 10:23 PM2023-09-26T22:23:08+5:302023-09-26T22:24:29+5:30
आज मी अभिमाने सांगू शकतो की, दलालांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सुधारणा करून दलालांना व्यवस्थेतून दूर करत पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
भ्रष्टाचाराला अंकुश लावण्यासाठी आम्ही अनेक कामे केली आहेत. 2014 पूर्वी भ्रष्टाचाराने देश बर्बाद केला होता. मात्र आज मी अभिमाने सांगू शकतो की, दलालांना रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सुधारणा करून दलालांना व्यवस्थेतून दूर करत पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनाले कार्यक्रमात लोकांना संबोधित करत होते.
विरोधकांवर हल्ला चढवताना नाव न घेता मोदी म्हणाले, "बेईमान लोकांना शिक्षा होत आहे, तर प्रामाणिक लोकांचा सन्मान केला जात आहे. माझ्यावर आरोप केला जात आहे की, मोदी लोकांना तुरुंगात टाकत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. पण, देशाची संपत्ती चोरीली असेल तर कुठे रहायला हवे? शोधून-शोधून पाठवायला हवे की नाही? तुम्हाला हवे, तेच काम मी करत आहे. काही लोक मोठ्या चिंतेत आहेत."
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसीचाही केला उल्लेख -
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या 30 दिवसांत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, गरीब तसेच मध्यम वर्गीयांना सशक्त बनवण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे, सरकारने कारागिरांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.
2047 वर काय म्हणाले मोदी? -
पीएम मोदी म्हणाले, जर आपण ठरवले, तर 2047 पर्यंत भारताला विकसित देश होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग आज आपल्याकडे पाहत आहे. देशाला अशक्य वाटणारी हमी आज मी देऊ शकतो, कारण यामागे तुमची ताकद आहे.