"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत," जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 01:38 PM2021-05-17T13:38:37+5:302021-05-17T13:41:25+5:30
Senior virologist Shahid Jameel resigned: INSACOG नं मार्चच्या सुरूवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला भारतीय म्यूटेंटबद्दल सांगितल्याचा ओवेसींचा आरोप.
वरिष्ठ व्हायरोलॉजिस्ट डॉ. शाहिद जमील (Virologist Shahid Jameel) यांनी रविवारी भारतीय SARS-CoV-2 जिनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या वैज्ञानिक सल्लागार समुहाच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. शाहिद जमील हे केंद्र सरकारने तयार केलेल्या एका खास सल्लागार समितीचे सदस्य होते, त्यांच्यावर व्हायरस जिनोम स्ट्रक्चरची ओळख पटवण्याची जबाबदारी होती. यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "INSACOG नं मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला धोकादायक भारतीय म्यूटेंटबाबत माहिती दिली होती. परंतु सरकारनं यावर लक्ष दिलं नाही," असा आरोप ओवेसी यांनी केला आहे. ओवेसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर निशाणा साधला.
"INSACOG जो एक सरकारी वैज्ञानिक सल्लागार समूह आहे, त्याचे अध्यक्ष एस. जमील यांनी आपला राजीनामा दिला आहे. INSACOG नं मार्च महिन्याच्या सुरूवातीला पंतप्रधान कार्यालयाला धोकादायक म्युटेंटबाबत इशारा दिला होता. परंतु सरकारनं यावर लक्षचं दिलं नाही. सरकारनं विज्ञानाला महत्त्व दिलं नाही असं जमील यांनी उघडपणे सांगिलं. आपण सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैज्ञानिक समजाची किंमत चुकवत आहोत," असं ओवेसी म्हणाले.
S Jameel head of INSACOG a govt scientific advisory group quit. INSACOG had warned @PMOIndia in early March about the dangerous Indian mutant but govt paid no heed. Jameel has frankly said that govt didn’t “take science into account”. We’re paying for Modi’s scientific illiteracy https://t.co/TGJpG8LW5x
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 17, 2021
कोरोना संकटात मोठी जबाबदारी
कोरोना संकटात केंद्र सरकारकडून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांना कोरोनाचे जीनोम स्ट्रक्टर ओळखण्याच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचा अध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र, त्यांनी रविवारी आपल्या पदावरून राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा का दिला याचं कारण अद्याप समोर आलेले नाही.
शाहिद जमील हे अशोका युनिव्हर्सिटीच्या त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक आहेत. त्यांनी नुकताच न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, भारतात वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित धोरण बनवण्यासाठी जिद्दी प्रतिक्रियांचा सामना करत आहोत. या लेखातून त्यांनी मोदी सरकारला वैज्ञानिकांचे म्हणणे ऐका, तसेच कोरोना विषयक धोरण बनवताना जिद्दीपणा सोडण्याचा सल्ला दिला होता. याचबरोबर एक व्हायरोलॉजिस्ट म्हणून कोरोना आणि लसीकरण यावर नजर ठेवून होतो. माझ्या अंदाजानुसार कोरोनाचे अनेक व्हेरिअंट पसरत आहेत. हेच कोरोनाच्या पुढच्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला होता.