आम्ही शांतीचे पुरस्कर्ते, पण हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर देऊ - गृहमंत्री
By admin | Published: January 2, 2016 11:38 AM2016-01-02T11:38:10+5:302016-01-02T11:39:54+5:30
भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे पण मात्र आमच्यावर कोणीही हल्ला केल्यास त्याचे सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे पण मात्र आमच्यावर कोणीही हल्ला केल्यास त्याचे सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले. पंजाबमधील पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. लष्करच्या गणवेशात आलेल्या चार दहशतवाद्यांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास हल्ला चढवत अंदाधुंद गोळीबार केला. सुमारे पाच तासांच्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले खरे पण त्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले व अन्य ६ जण जखमी झाले.
या सर्व घडामोडींची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांना दिली. ' भारत हा शांतीचा पुरस्कर्ता आहे. आणि शेजारी देश असलेल्या पाकिस्तानी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण कोणी आमच्या देशावर तुटून पडले, हल्ला केला, तर त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ' असे ते म्हणाले.
दहशतवाद्यांशी लढताना जवानांनी दाखवलेल्या धैर्याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगत त्यांनी भारतीय लष्कर व पंजाब पोलिसांचेही कौतुक केले.