चीन व पाकविरुद्ध लढण्यास आम्ही तयार
By Admin | Published: June 30, 2017 02:10 AM2017-06-30T02:10:11+5:302017-06-30T02:10:11+5:30
चीन व पाकिस्तानच्या तसेच अंतर्गत धोक्याविरुद्ध लढायला भारतीय लष्कर तयार आहे, असे संकेत देणारे उद्गार लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चीन व पाकिस्तानच्या तसेच अंतर्गत धोक्याविरुद्ध लढायला भारतीय लष्कर तयार आहे, असे संकेत देणारे उद्गार लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी काढले. लष्करप्रमुख रावत आज सिक्कीमच्या दौऱ्यावर होते. सिक्कीमच्या सीमावर्ती भागात दोन दिवसांपूर्वी चीनच्या लष्कराने घुसखोरी केली. त्या पार्श्वभूमीवर जनरल रावत यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना हे उद्गार काढले.
त्यांच्या वक्तव्यामुळे संतापलेल्या चीनने इतिहासापासून (१९६२ च्या युद्धापासून) धडा घ्या, अशी गर्भित धमकी लष्करप्रमुखांना दिली आहे. अशी भडक विधाने करू नका, असे सांगतानाच चीनच्या प्रवक्त्याने जनरल रावत यांचे वक्तव्य अतिशय बेजबाबदार आहे, अशी टीका केली आहे. चीन व पाकिस्तान यांचा थेट उल्लेख न करता लष्करप्रमुख म्हणाले की, दोन्ही आघाड्यांवर लढायला आमची तयारी आहे. राजकीय नेतृत्व जसे सांगेल, तसे करण्यास आम्ही सज्ज आहोत.
तशी क्षमता आमच्यामध्ये आहे. उत्तरेकडील सीमेवर व नियंत्रण रेषेवर संबंध चांगले राहण्यास लष्कराची कायमच तयारी असते. (सिक्कीमचा) तो भाग आमचाच असून, भारतानेच तेथे घुसखोरी केली आहे, असे चीनने म्हटले होते. चीनने त्या भागात रस्तेबांधणीही केली आहे. तो भाग भारत-चीन व भूतान यांच्या सीमेवर असला तरी तो भारताचे अविभाज्य अंग आहे, अशी भारताची भूमिका आहे. भूताननेही आमच्या भागात चीनने रस्तेबांधणी सुरू केल्याचा आरोप केला आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) आमच्या सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप भूतानने केला होता. आमचे सैन्य ‘चीनच्या भूभागातच’ असून भारताने ‘स्वत:च्या चुका’ दुरुस्त करून घ्याव्यात, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.