संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही अन् सामनाही वाचत नाही- नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 08:29 IST2021-05-10T08:19:38+5:302021-05-10T08:29:04+5:30
केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित संजय राऊत यांना माहिती नसावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही अन् सामनाही वाचत नाही- नाना पटोले
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध विरोधी पक्ष भाजपा यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप अजूनही सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय करता येईल यासाठी सध्या राज्य सरकार विविध अंगांनी विचार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोगानंतर आखणी एक नवीन आयोग बसवण्याच्या विचारात आहे. या मुद्द्यावरून पटोले यांनी सरकारला सुनावले आहे. समाजाला माग ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. त्यामुळं नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही, असं म्हणत पटोले यांनी सुनावलं आहे.
नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं भयावह चित्र संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, भाजपला 24 तास फक्त सत्ता पाहिजे, देशात कोरोनाच्या चितेमध्ये लोक जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारात लागले होते, अशी टाकी नाना पटोले यांनी केली आहे.
केंद्र सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे, हे त्यांच्या पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या सूचक विधानातून स्पष्ट होते. स्वामींनी थेट देशाच्या नेतृत्वार प्रश्न उपस्थित केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत राजकारण नको,हीच आमची भूमिका आहे, असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
जनतेचे प्रश्न समजून घेऊन काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. जनतेचे प्रश्न जे आहे ते प्रश्न घेऊन आम्ही काम करतोय, सत्तेपेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही काम करत आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
संजय राऊत यांच्यावर निशाणा-
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबाबत नाराजी देखील नाना पटोले यांनी बोलावून दाखवली आहे. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना देखील वाचत नाही. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित संजय राऊत यांना माहिती नसावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.