आम्ही मशिदीत येत नाही मग तुम्ही देवळात येऊन आम्हाला भ्रष्ट का करता?; भाजपा आमदाराचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 03:55 PM2018-05-28T15:55:14+5:302018-05-28T16:00:14+5:30
आम्हाला मशीद किंवा मंदिरामध्ये जाण्याचा हक्क नाही.
देहरादून: काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या रामपूर येथील मंदिरात घडलेल्या एका प्रसंगावरून स्थानिक राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. येथील एका मंदिरात एक मुस्लिम युवक हिंदू तरूणीसोबत आला होता. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने संबंधित तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. आणखी काही काळ तरूण जमावाच्या ताब्यात राहिला असता तर जमावाने कदाचित त्याला ठार मारले असते. मात्र, याठिकाणी तैनात असलेले पोलीस निरीक्षक गगनदीप सिंग यांनी धाडस दाखवून तरूणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. यावेळी संतप्त झालेला जमाव पोलिसांना जुमानत नव्हता. काहीही करून संतप्त जमावाला तरुणाला मारायचेच होते. परंतु, पोलीस अधिकारी गगनदीप सिंग शेवटपर्यंत न डगमगता उभे राहिले व या तरुणाला जमावाच्या तावडीतून सुखरूप सोडवले.
या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार राजकुमार ठकुराल यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्हाला (हिंदू) मशिदीत किंवा मदरशांमध्ये जाण्याचा हक्क नाही. मग ते (मुस्लिम युवक) मंदिरात येऊन आमचा धर्म का भ्रष्ट करू पाहतात? असा सवाल राजकुमार ठकुराल यांनी विचारला. प्रशासन किंवा कायदा कोणीही यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मात्र, आता अशा लोकांना धडा शिकवायची वेळ आली आहे. प्रशासन आणि पोलीस वेळीच जागे झाले नाहीत तर आम्हाला आमच्या पद्धतीने हे सर्व हाताळावे लागेल, असे ठकुराल यांनी सांगितले.
#WATCH "We don't go to mosques or madrasas because we don't have the right to go. Why did they go to temple with an intention to destroy Hindu Sabhyata?," says BJP MLA Rajkumar Thukral on Sub Inspector Gagandeep Singh rescuing a Muslim man from a mob in #Uttarakhand’s Ramnagar pic.twitter.com/5rTLwBUs3X
— ANI (@ANI) May 28, 2018