"आम्हाला कोणती खुर्ची नको, भाजपची राजवट घालवायचीय", 'बेटी बचाओ'वरून ममता बॅनर्जी कडाडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 03:05 PM2023-07-21T15:05:30+5:302023-07-21T15:06:05+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही सहभाग आहे. पण विरोधकांच्या आघाडीचा चेहरा कोण असेल या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधकांना डिवचत आहेत. अशातच मणिपूरमधील हिंसाचारची क्रूरता, महिलांवरील अत्याचार आणि जाळपोळ यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला घेरले आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत टीकास्त्र सोडले.
मणिपूर हिंसाचारावरून ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदींचे नाव न घेता ममता म्हणाल्या, "भाजपाने 'बेटी बचाओ'चा नारा दिला होता, आता तो नारा कुठे आहे? आज मणिपूर जळत आहे. तसेच बिल्किस बानो प्रकरणात आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. ब्रिजभूषण सिंह यांना देखील कुस्ती प्रकरणात जामीन मिळाला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत देशातील महिला तुम्हाला देशाच्या राजकारणातून फेकून देतील", असा घणाघात त्यांनी केला.
We don't want any chair, we just want this BJP regime to go: WB CM Mamata Banerjee
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2023
ममता बॅनर्जींचं टीकास्त्र
दरम्यान, आम्हाला कोणत्याही खुर्चीचा मोह नसून भाजपाची ही राजवट घालवायची आहे, असेही ममता बॅनर्जींनी म्हटले. "भाजपाने पश्चिम बंगालमध्ये अनेक केंद्रीय पथके पाठवली, पण मणिपूरला केंद्रीय पथक का पाठवले नाही? मला पंतप्रधान मोदींना विचारायचे आहे की, मणिपूरमधील घटनेने तुम्ही थोडे देखील दुखावला नाहीत का? तुम्ही पश्चिम बंगालकडे नेहमी बोट दाखवता पण तुम्हाला माता बहिणींवर प्रेम नाही का? कधीपर्यंत अशा मुली जळणार, दलित, अल्पसंख्याक मारले जाणार, शेकडो माणसं मारली जाणार? आम्ही मणिपूरकडे दुर्लक्ष करणार नाही कारण ईशान्येकडील बहिणी आमच्या बहिणी आहेत", अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.