'आम्हाला आयात उमेदवार नको...', J&K भाजपमध्ये नाराजी, कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्षांना घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 03:37 PM2024-08-26T15:37:25+5:302024-08-26T15:37:52+5:30
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
BJP J&K Candidate List : आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी (26 ऑगस्ट) उमेदवारांची यादी जाहीर केली. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी 15 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. दरम्यान, उमेदवारांच्या नावांवरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी जम्मू-काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांच्या ऑफिसबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
जम्मू-काश्मीर भाजपात नाट्यमयी घडामोडी
आज भाजपने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या 44 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर पक्षाने ही यादी मागे घेतली आणि पहिल्या टप्प्यासाठी 15 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत ज्यांना तिकीट दिले गेले नाही ते आणि त्यांचे समर्थक पक्षावर नाराज असल्याचे दिसत आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत त्यांच्या कार्यालयाला घेराव घातला.
#WATCH | Jammu, J&K: Supporters of BJP leaders who did not get a ticket to contest in J&K Assembly elections reach BJP Office in Jammu, demanding a ticket for their candidate. pic.twitter.com/tbZo7bVfA3
— ANI (@ANI) August 26, 2024
रवींद्र रैना यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यासाठी आलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, भाजपमध्ये कष्टाळू कार्यकर्ता नाही का? किश्तवाडची जागा कोणाच्या भरवशावर सोडली? ही जागा गमावल्यावर जबाबदार कोण असेल? आम्हाला स्थानिक पातळीवर काम करणारे उमेदवार हवे आहेत, आयात केलेले उमेदवार नको. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ओमी कजुरिया यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. ओमी कजुरिया हे जम्मूमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आशा होती की, पक्ष त्यांना जम्मू उत्तर मतदारसंघातून उमेदवारी देईल. पण, भाजपच्या यादीत त्यांचे नाव नव्हते.
#WATCH | Jagdish Bhagat, President BJP J&K SC Morcha, says "...I have been working all day for BJP for the last 18 years but today injustice has been done to me. SSP Mohan Lal joined BJP 2 days ago and he was given a mandate. If this mandate is not hanged, BJP will have to face… pic.twitter.com/8oC1smMBx4
— ANI (@ANI) August 26, 2024
मी प्रत्येक कार्यकर्त्यांशी बोलेन: रवींद्र रैना
कार्यकर्त्यांच्या निदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, आपण सगळे मिळून बोलू. आपण सर्व भाजपचे कार्यकर्ते आहोत. आपण सर्व एकाच कुटुंबातील सदस्य आहोत. मी तुम्हा सर्वांचा आदर करतो. आपण सर्वजण राष्ट्र उभारणीच्या भावनेने काम करतो. मी एक एक करून तुम्हा सर्वांना भेटेन आणि बोलेन, मी तुमचे ऐकेन. आपल्यासाठी आधी राष्ट्र आणि नंतर पक्ष येतो. कार्यकर्त्यांनी तिकिटाबद्दल नाराज होऊ नये, असे ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या 90 जागांसाठी 18 आणि 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यात 40 जागांवर मतदान होईल. तर, 4 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये येथे शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती.