'आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली', फडणवीसांनी दिल्लीतून सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 04:21 PM2022-07-09T16:21:07+5:302022-07-09T16:22:55+5:30
दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
नवी दिल्ली - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. आज शनिवार दुपारी साडेचार वाजता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच सरकार स्थापन केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं.
दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर, देवेंद्र फडणवीसांनी हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. खरी शिवसेना ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि त्याच शिवसेनेसोबत आम्ही युती केली आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच, उपमुख्यमंत्रीपदाबाबात विचारले असता, मला माझ्या पक्षाने मोठे केले. त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मला संधी दिली. माझ्यासाठी पक्षाचा आदेश हा नेहमीच महत्त्वाचा होता, आहे आणि राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार यशस्वी व्हावे, हाच आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही ते म्हणाले.
खरी शिवसेना ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि त्याच शिवसेनेसोबत आम्ही युती केली आहे : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 9, 2022
खातेवाटपाबाबत कुठलिही चर्चा नाही
दिल्ली दौर्यात खातेवाटप किंवा तत्सम विषयांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. आषाढी एकादशीची पूजा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत आले की यासंदर्भात आम्ही एकत्रित बसून चर्चा करू. आम्ही उपराष्ट्रपतीजी यांची सुद्धा वेळ मागितली होती. ते सध्या कर्नाटक दौर्यावर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र त्यांनी दूरध्वनीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पुढच्या काळात निश्चितपणे वेळ देण्याचे त्यांनी आश्वस्त केले आहे.