आम्हीच पठाणकोट हल्ला केला
By admin | Published: January 22, 2016 02:48 AM2016-01-22T02:48:17+5:302016-01-22T02:48:17+5:30
पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचे सांगत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली आहे
नवी दिल्ली : पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचे सांगत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली आहे. ज्याचा खून झाला तो बळी आणि मारेकऱ्याचा मित्र अशा दोघांचे वकीलपत्र तुम्ही एकाचवेळी घेऊ शकत नाही, असे सांगत त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मुलाखतीची टर उडविली. शरीफ यांनी पाकिस्तानी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादावर टीका केली होती. सलाहुद्दीनने भारत-पाक चर्चेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे सांगत या हल्ल्याचा संबंध जोडू नये असेही स्पष्ट केले आहे.
आम्ही भारताच्या लष्करी संस्थांना लक्ष्य बनविले असून पठाणकोट हल्ला हा या कारवाया सुरू ठेवण्याचाच एक भाग आहे, असे सलाहुद्दीन याने पाकिस्तानातील ‘वजूद’ या उर्दू न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
> काश्मीर वादात पाकिस्तान हा मूळ पक्ष...
1 पाकिस्तान हा काश्मीर मुद्यात मूळ पक्ष असल्याचे सलाहुद्दीन याने शरीफ यांच्या काश्मीर धोरणाविरोधात भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे. काश्मीरमधील दबलेल्या घटकांच्या भावना आणि आकांक्षा पाहता पाकिस्तान हा जबाबदार घटक ठरतो.
2 तुम्ही बळी गेला त्याची आणि खुन्याच्या मित्राची वकिली एकाचवेळी करू शकत नाही. भारत-पाक चर्चा बंद पाडण्यासाठी पठाणकोट हल्ल्याचा कट रचण्यात आला हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. चर्चेच्या दीडशे फेऱ्या वांझोट्या ठरल्या आहेत, असे तो म्हणाला.
> सीमेवर घुसखोराचा खात्मा
गुरुदासपूर (पंजाब) : सीमा सुरक्षा दलाने गुरुवारी सकाळी पठाणकोटमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर एका ३० वर्षीय घुसखोराचा खात्मा केला. २ जानेवारीला हवाईदल तळावरील हल्ल्यापासून बीएसएफ अतिसतर्क आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात बीएसएफच्या चमूला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान बामियालच्या ताश परिसराजवळ किमान तीन घुसखोरांच्या संशयित हालचाली दिसल्या. त्यांना रोखण्याकरिता गोळीबार करण्यात आला. या कारवाईत एक घुसखोर ठार झाला तर त्याचे सहकारी पळून गेले.