गौरी लंकेश यांच्या हत्येशी आमचा काही संबंध नाही - सनातन संस्थेने केला हत्येचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 12:03 PM2017-09-22T12:03:19+5:302017-09-22T12:07:19+5:30
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्या हत्येचा सनातन संस्थेने निषेध केला असून या हत्येशी सनातन संस्था अथवा हिंदू जनजागृती समिती यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे
बेंगळुर - पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्या हत्येचा सनातन संस्थेने निषेध केला असून या हत्येशी सनातन संस्था अथवा हिंदू जनजागृती समिती यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. हिंदू कार्यकर्ते आणि डाव्या विचारसरणीचे लोक यांच्यात वैचारिक मतभेद आहेत, परंतु म्हणून डाव्या विचारसरणीच्या लोकांचा खून हिंदू कार्यकर्त्यांनी केला असं मानणं चुकीचं आहे असं सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बेंगळुर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
आम्ही विचारांचा मुकाबला विचारांनी केला आहे आणि लोकशाही मार्गाने जात कायदेशीर उपाय केले आहेत असा दावा राजहंस यांनी केला. गोवास्थित सनातन संस्थेवर हिंदुत्वविरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप अनेक महिन्यांपासून होत आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी विशेष चौकशी समितीला सहकार्य करण्याची संस्थेची तयारी असल्याचेही राजहंस म्हणाले. गोव्यातील पोंडा या मुख्यालयात यावे आणि अधिकाऱ्यांनी चौकशी करावी असे त्यांनी सांगितले. या हत्येशी संदर्भात अद्याप पोलीसांनी संस्थेची चौकशी केली नसल्याचेही ते म्हणाले.
काही राजकीय नेते, ढोंगी मुक्त विचारसरणीचे लोक आणि पत्रकार हिंदुत्ववादी संघटनांवर लंकेश यांची हत्या केल्याचा बेछुट आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव व वकिल संजीव पुनाळेकर यांनी असा आरोप केला आहे की, हिंदू जनजागृती समितीचे नेते डॉ. विरेंद्र तावडे व संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड यांना नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विनाकारण गोवण्यात आले आहे.
गौरी लंकेश प्रकरणी तपास पथकानं नक्षली, कौटुंबिक कलह, मालमत्ता वाद, स्थानिक वाद आणि लंकेश यांना मिळत असलेला निधी या अंगानं चौकशी करायला हवी असं मत पुनाळकर यांनी व्यक्त केलं आहे. विशिष्ट बनावटीच्या पिस्तुलानं लंकेश यांची हत्या झाली यावरून विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी हत्या केली असा निष्कर्ष काढणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. याप्रकरणी संस्था व समिती या दोघांना गोवणं गैर असल्याचं ते म्हणाले.
दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांची हत्या ज्या शस्त्रांनी झाली त्याबाबत उलटसुलट अहवाल असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. पोलीसांनीच यासंदर्भात उलट सुलट मतं व्यक्त केल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं आहे. विशेष तपास पथकाला सनातन संस्थेची चौकशी करायची असेल तर त्यास आम्ही तयार आहोत असं पुनाळेकर म्हणाले. तपास पथकं स्थानिक पोलीसांच्या मदतीनं काही साधकांना फोन करून माहिती घेत असल्याचे पुनाळेकर यांनी सांगितले.