आम्हीच दाखविली जमीन, आकाश, अंतराळात सर्जिकल स्ट्राइकची हिंमत - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 04:45 AM2019-03-29T04:45:58+5:302019-03-29T04:50:01+5:30
केंद्रातील एनडीए सरकारने जमीन, आकाश, अंतराळामध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत दाखविली, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.
मेरठ : केंद्रातील एनडीए सरकारने जमीन, आकाश, अंतराळामध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत दाखविली, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. आगामी लोकसभा निवडणुका म्हणजे आमचे निश्चयी सरकार व गतकाळातील गोंधळलेले राज्यकर्ते यांच्यातील सामना आहे, असेही ते म्हणाले.
उपग्रहनाशक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा ‘मिशन शक्ती’ कार्यक्रम यशस्वी झाल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून भाजपाच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करताना ते बोलत होते. मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवातही मेरठमधूनच केली होती. ते तेव्हा आणि आजही म्हणाले की, १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध याच मेरठ शहरातून सुरू झाले होते. अन्यायाविरोधातील लढाई आपणही येथूनच सुरू करीत आहोत.
प्रचारसभेच्या आधी त्यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना आदरांजली अर्पण केली. भारताच्या थोर सुपुत्रांपैैकी एक असलेल्या चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यायला तत्कालीन सरकारांना भाग पाडले होते, असेही मोदी म्हणाले. चौधरी चरणसिंह यांचे पुत्र व राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख अजित सिंह यांनी उत्तर प्रदेशमध्ये सपा व बसपाशी आघाडी केली आहे.
मोदी म्हणाले की, एनडीएलाच पुन्हा केंद्रात सत्तेत आणायचे हे देशातील नागरिकांनी ठरविले आहे. भारताचा विकास झाला पाहिजे. शत्रूंपासून त्याचे संरक्षण झाले पाहिजे. कामे करणारे सरकार आमच्या रूपाने देशाने प्रथमच पाहिले. दमदार भाजपा व दागदार (कलंकित) विरोधक अशी लढाई या लोकसभा निवडणुकांत होणार आहे.
काम जनतेने पाहिलेय
एनडीए सरकारने कोणती कामगिरी केली हे प्रचारसभांमध्ये सांगणारच आहे. त्याचबरोबर गतकाळात
सत्तेवर असणाऱ्यांना देशाची प्रगती का करता आली नाही, असा सवालही विचारणार आहे. आमच्या सरकारने केलेली उत्तम प्रगती जनतेने पाहिली आहे. दुसºया बाजूला दूरदृष्टी नसलेले विरोधकही देशाने बघितले आहेत, असे मोदी म्हणाले.