नुसते मारत नाही, थेट स्मशानात पोहोचवतो; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 08:15 PM2018-11-16T20:15:53+5:302018-11-16T20:17:07+5:30
भाजपने पश्चिम बंगालमध्ये लोकशाही वाचविण्यासाठी यात्रेचे आयोजन केले होते.
कोलकाता : भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये करण्याची सवय काही कमी झालेली दिसत नाही. पश्चिम बंगालच्याभाजपा अध्यक्षाने तर भर सभेमध्ये ठार मारण्याची धमकी देत थेट स्मशानात पोहोचवण्यारा पक्ष अशी भाजपची ओळख असल्याचे वक्तव्य केले आहे. यावरून पश्चिम बंगालमध्ये पुन्हा वाद निर्माण होणार आहेत.
भाजपने पश्चिम बंगालमध्ये लोकशाही वाचविण्यासाठी यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी पश्चिम बंगालचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी हे वक्तव्य केले. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट धमकी देताना घोष म्हणाले की, आमच्यावर हल्ला झाल्यास हलक्याने घेतले जाणार नाही. तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये न जाता थेट स्मशानात जाल. ही खरी भाजपाची ओळख आहे. आम्ही कधीही प्रत्युत्तराची वाट पाहत नाही. वेळ होण्याआधीच सरळ करतो.
घोष यांच्या या वक्तव्याची चित्रफित समाजमाध्यमांवर फिरत असून त्यांनी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या एका मुव्हीमधील डायलॉगही मारला आहे. आम्ही इथेच ठार करतो आणि मृतदेह थेट स्मशानभुमीत जातो, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच त्यांनी तृणमूल काँग्रेसला उद्देशून म्हटले की, आम्ही उपचार करण्याआधी ताकीद देतो. सारखे सारखे समजावत बसत नाही. आम्ही हात उचलला तर तो नुसता हात नसतो तर हातोडा असतो. तुम्हाला हा हात पडल्यावर कळेलच. चावणारा कुत्रा कधी भुंकत नाही. हा कुत्रा वेळ आली की उत्तरे देईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.