'आम्ही एक मशीद गमावली, आता...', वक्फ विधेयकावरुन असदुद्दीन ओवेसींचा केंद्रावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 19:33 IST2024-09-02T19:32:57+5:302024-09-02T19:33:27+5:30
वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात असदुद्दीन ओवेसींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

'आम्ही एक मशीद गमावली, आता...', वक्फ विधेयकावरुन असदुद्दीन ओवेसींचा केंद्रावर हल्लाबोल
Asaduddin Owaisi on Waqf Bill : लोकसभा खासदार आणि एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा वक्फ दुरुस्ती विधेयकावरुन केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. यासोबतच या दुरुस्ती विधेयकाविरोधात लवकरच आंदोलनाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. "आम्ही एक मशीद गमावली, पण आता आणखी मशीद, खानकाह, दर्ग्यांना गमावू इच्छित नाही. त्यामुळे लवकरच वक्फ वाचवण्यासाठी आंदोलनाची घोषणा करू", असे ओवेसी म्हणाले.
तेलंगणातील महबूबनगरमध्ये बोलताना ओवेसी म्हणाले की, "पंतप्रधान मोदी, तुम्हाला केंद्रीय वक्फ बोर्ड आणि राज्य वक्फ बोर्डात गैर-मुस्लिमांना सदस्य का बनवायचे आहे? प्रत्येक धर्माने आपाला धर्म पाळावा, हीच या देशाची ताकद आहे. मात्र तुम्ही फक्त मुस्लिमांना टार्गेट करत आहेत. वक्फचा मुद्दा देवबंदी, बरेलवी आणि अहल-ए-हदीसचा नसून संपूर्ण मुस्लिमांचा मुद्दा आहे."
'हिटलरच्या काळात ज्यूंचे काय झाले...'
ओवेसी पुढे म्हणाले, " मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारू इच्छितो की, वक्फ नसेल तर माझ्या मालमत्तेचे संरक्षण कोणत्या कायद्यानुसार होईल? हिटलरच्या काळात जर्मनीत ज्यू लोकांसोबत जे झाले, आज त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आपल्या देशातील मुस्लिमांसोबत होत आहे. भाजपचे लोक म्हणतात की, 8 लाख एकर जमीन वक्फची आहे. ही जमीन कोणत्याही सरकार, आरएसएस, भाजप किंवा राजकीय पक्षाने दिली नाही. आमच्या पूर्वजांनी दिली आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.