सन २०२० मध्ये २१५ दहशतवाद्यांचा खात्मा; अत्याधुनिक शस्त्रांनी सुरक्षादल होणार मजबूत
By देवेश फडके | Published: January 21, 2021 02:08 PM2021-01-21T14:08:11+5:302021-01-21T14:09:46+5:30
सन २०२० मध्ये खात्मा करण्यात आलेल्यांमध्ये रियाज नायकूसह अनेक वॉन्टेड दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक डॉ. ए.पी. माहेश्वरी यांनी दिली.
जम्मू : गतवर्षी सन २०२० मध्ये एकूण २१५ दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक डॉ. ए.पी. माहेश्वरी यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सन २०२० मध्ये खात्मा करण्यात आलेल्यांमध्ये रियाज नायकूसह अनेक वॉन्टेड दहशतवाद्यांचा समावेश आहे. विविध चकमकीत एकूण २१५ दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले, असेही ते म्हणाले. कोब्रा फोर्सच्या नक्षलविरोधी पथकात आता महिला योद्धांचाही समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
In the year 2020, we neutralized a total of 215 terrorists including Riyaz Naiko in Jammu and Kashmir: DG CRPF, Dr AP Maheshwari pic.twitter.com/WIFl0a90mN
— ANI (@ANI) January 21, 2021
महासंचालक डॉ. ए.पी. माहेश्वरी यांनी सांगितले की, केंद्रीय राखीव पोलीस दलात आता यूएवी, ट्रॅकर्स, असॉल्ट रायफल्स यांचाही समावेश करण्यात आला आहे. नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच शस्त्रे यांच्या मदतीने केंद्रीय राखीव पोलीस दल आणखी मजबूत केले जाणार आहे, असे ते म्हणाले.
के-९ पथकाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, बेंगळूरू येथे एक श्वान पथक आणि प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच सायबर सेक्युरिटीसाठी शारीरिक कमकुवत असलेल्यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे ते सन्मानाने जगू शकतील आणि आपले योगदान देऊ शकतील, असा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तान लष्कारातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात अल-बद्र या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.