Triple Talaq: 'मुस्लिम जनता कायदे नव्हे, फक्त आणि फक्त कुराण मानते'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:11 PM2018-12-27T18:11:55+5:302018-12-27T18:16:17+5:30
समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांचं वादग्रस्त विधान
रामपूर: संसदेत तीन तलाक विधेयकावर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांच्या विधानानं खळबळ माजली आहे. मुस्लिमांना कोणताही कायदा मान्य नाही. मुस्लिम फक्त कुराणला मानतात, असं वादग्रस्त विधान खान यांनी केलं आहे. कुराणमध्ये जे लिहिलंय, तेच मुस्लिम जनता मानेल. मात्र इतर कोणताही कायदा मानणार नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. त्यांच्या या विधानानं मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
आज लोकसभेत तिहेरी तलाकविरोधी विधेयकावर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसनं आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केला होता. संसदेत वादळी चर्चा सुरू असताना रामपूरमध्ये आझम खान यांनी तिहेरी तलाकबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. 'जे मुस्लिम आहेत, जे कुराणला मानतात, त्यांना तलाकची पूर्ण प्रक्रिया माहिती आहे. तलाकच्या संपूर्ण प्रक्रियेचा तपशील कुराणमध्ये देण्यात आला असल्याची कल्पना त्यांना आहे. त्या प्रक्रियेशिवाय इतर कोणताही कायदा आम्हाला मान्य नाही. फक्त कुराणमधील नियम आम्हाला मान्य आहेत,' असं खान म्हणाले.
आम्ही फक्त कुराणचे नियम मानतो, याचा आझम खान यांनी वारंवार पुनरुच्चार केला. 'संपूर्ण जगात मुस्लिम फक्त आणि फक्त कुराणचा कायदा मानतात. याशिवाय आम्ही कोणताही कायदा मानत नाही. हा आमचा धार्मिक विषय आहे. मुस्लिमांसाठी पर्सनल लॉ बोर्ड आहे. आम्ही कसं लग्न करावं, कोणत्या पद्धतीनं लग्न करावं, कसा तलाक द्या, या आमचा वैयक्तिव विषय आहे,' असं खान यांनी म्हटलं.