भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्याची प्रतिज्ञा करू
By admin | Published: May 29, 2016 03:37 AM2016-05-29T03:37:31+5:302016-05-29T03:37:31+5:30
भाजपा सरकारच्या सत्तेतील दोन वर्षांच्या काळात मोठे बदल झाले आहेत. सुशासनाची अंमलबजावणी करताना भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्याची आम्ही शपथ घेतली आहे. ज्या सर्वसामान्य
नवी दिल्ली : भाजपा सरकारच्या सत्तेतील दोन वर्षांच्या काळात मोठे बदल झाले आहेत. सुशासनाची अंमलबजावणी करताना भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्याची आम्ही शपथ घेतली आहे. ज्या सर्वसामान्य नागरिकांना गेल्या काही वर्षांत फक्त लुटण्यात आले त्यांच्यासाठी आता आशेचा नवा किरण घेऊन आम्ही आलो आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या सकारात्मक कामांना अधोरेखित करत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. निमित्त होते सरकारच्या द्विवर्षपूर्तीचे.
काँग्रेसचे नाव न घेता त्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधक अडवणुकीचे धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला. यातील वास्तव काय आहे, हे जाणण्याची क्षमता नागरिकांत आहे, असेही ते म्हणाले. यूपीए सरकारच्या काळातील घोटाळ्यांची आठवण करून देत मोदी म्हणाले की, मागील सरकारच्या काळातील कामाच्या तुलनेत लोक आमच्या सरकारच्या विकासकामांकडे पाहत आहेत. जोपर्यंत आम्ही गत सरकारच्या काळातील कामाचा आढावा घेत नाही तोपर्यंत आम्हाला याची जाणीव होणार नाही की, आम्ही किती मोठा टप्पा पूर्ण केला आहे.
मी आज देशातील जनतेसमोर समाधानाने उभा आहे. आमच्या कामाचे बारकाईने निरीक्षण होत असूनही आम्ही जनतेचा विश्वास आणि प्रोत्साहन मिळवू शकलो. जनतेचा आमच्यावरील विश्वास दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढत आहे. जे केवळ राजकीय कारणांसाठी आम्हाला विरोध करीत आहेत, त्यांच्याबाबत मी हे म्हणणार नाही; परंतु मी एक म्हणू शकतो की, एका बाजूला विकासवादाचा अजेंडा आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधवाद आहे. आमच्या सरकारने कोणताही निर्णय दुर्भावनायुक्त हेतूने घेतलेला नाही, हे नक्की, असेही मोदी म्हणाले.
आमचे सरकार खूप मेहनतीने काम करीत आहे आणि आम्ही केलेल्या कामातून जनतेचा विश्वासही तेवढाच मिळत आहे. देशाचे हित हेच आमचे सर्वोच्च ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करीत राहणार. हे मात्र खरे आहे की, ज्यांनी जनतेचा पैसा आपल्या खिशात घातला ते अडचणीत येतील व त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल. अर्थात, ते कुणी खिशात घातले आणि केव्हा घातले, याला माझ्यालेखी काहीही महत्त्व नाही; परंतु हा जनतेचा पैसा होता आणि तो इतरत्र कुठेही जाऊ देणार नाही, असे मोदी म्हणाले.
विविध कार्यक्रम, प्रकल्पांमधून इतरत्र जाणारा पैसा वाचवून आम्ही ३६ हजार कोटी रुपयांची बचत केली आहे. ज्यांनी एकेकाळी या भ्रष्टाचाराचा मलिदा लाटला, ते मात्र दुखावले गेले आहेत. काही लोक मला म्हणतात की, तुम्ही विरोधकांशी दोन हात करून आणि खूप टीका झेलूनही काम करीतच राहता. ते मला माध्यमांशी जास्त जोडले जाण्याचा आणि संवाद साधण्याचा सल्ला देतात; परंतु मी त्यांना कसे सांगणार की, ज्यांनी ३६ हजार कोटी रुपये लुटले ते आता माझ्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यांनीच जनतेचा पैसा लुबाडला होता. आमचे यश कशात असेल तर आम्ही जनतेचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समर्पित भावनेने काम करीत आहोत.
मोदींनी दोन वर्षांत काहीही केले नाही, या काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले की, आमच्या देशातील जनता सत्य शोधून काढण्यास सक्षम आहे. विकासवाद आणि विरोधवाद याची तुलना जनता योग्य पद्धतीने करू शकते. सरकारने उचललेल्या प्रत्येक पावलाची बारकाईने तुलना करावी. देशाला निराशेच्या खाईत टाकले जाईल, असे काहीही केले जाणार नाही, याकडे गांभीर्याने पाहिले जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तिकडे आत्महत्या, इकडे सेलिब्रेशन...
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी एकीकडे आत्महत्या करीत आहेत आणि केंद्रातील मोदी सरकार दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इंडिया गेटजवळ सेलिब्रेशन करीत आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.