लोकसभेचं उपाध्यक्षपद आम्हाला मिळालंच पाहिजे, शिवसेनेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 11:29 AM2019-06-06T11:29:38+5:302019-06-06T11:56:43+5:30
17व्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात 353 खासदार निवडून आले आहेत.
नवी दिल्लीः 17व्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात 353 खासदार निवडून आले आहेत. एकट्या भाजपानंच बहुमताचा आकडा पार करत 303 खासदार निवडून आणलेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेत त्यांच्या 57 सहकाऱ्यांनाही मंत्रिपदाची दिली. विशेष म्हणजे शिवसेनेचे 18 खासदार असूनही त्यांच्या वाट्याला फक्त एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. शिवसेनेच्या वाट्याला कायम दुय्यम दर्जाचं अवजड उद्योग खातं दिलं जात असल्यानं शिवसेनेमध्येही नाराजी आहे. त्यातच आता शिवसेनेनं लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा केला आहे. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेनं दावा केला आहे.
ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे हे पद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास भावना गवळींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या अनुभवी खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग तीनदा त्यांनी खासदार होण्याचा मान मिळवला आहे, लोकसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना यंदा मंत्रिपद मिळण्याचा अंदाज बांधला जात होता. पण शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकमेव मंत्रिपदाची माळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या गळ्यात टाकली. त्यामुळे साहजिकच भावना गवळी नाराज झाल्याचीच चर्चा होती.
Shiv Sena's Sanjay Raut on claim for Deputy Speaker in Lok Sabha: Humari yeh demand nahi hai, humara ye natural claim aur hakk hai, yeh pad Shiv Sena ko milna chahiye. pic.twitter.com/zMXqg9KN83
— ANI (@ANI) June 6, 2019
खासदारसंख्या पाहता लोकसभेचं अध्यक्षपद भाजपाकडे राहील. त्यामुळे लोकसभा उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला आहे. किंबहुना लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेने भाजपकडे आग्रही मागणी केली आहे. तसेच पुढील मंत्रिमंडळ विस्तारात खाते बदलून द्यावे आणि संख्याबळाच्या प्रमाणात मंत्रिपदे द्यावीत, अशी मागणीही शिवसेनेने केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.