संपुआच्या काळात तोट्यात गेलेल्या सरकारी बँका आम्ही केल्या मजबूत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 06:43 AM2023-07-23T06:43:14+5:302023-07-23T06:43:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी : ७० हजार जणांना दिली नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) सरकारने घोटाळे करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बरबाद केले होते. आपल्या सरकारने या बँकांना मजबूत केल्यामुळे आता भारत आतामजबूत बँकिंग क्षेत्रासाठी ओळखला जातो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
शनिवारी केले.
येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान बोलत होते. या मेळाव्यात त्यांनी ७० हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना डिजिटल माध्यमाद्वारे नियुक्तिपत्रे जारी केली. रोजगार मेळाव्यास संबोधित करताना मोदी यांनी सांगितले की, आज नियुक्त्या मिळालेल्या कर्मचाऱ्यांत बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. संपुआ सरकारच्या काळातील अनेक घोटाळ्यांमुळे बँकिंग क्षेत्र बरबाद झाले होते. फोन बँकिंग घोटाळा हा त्यातलाच एक. त्यामुळे बॅंकांची कंबर माेडली हाेती. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे, असे पंतप्रधान माेदी म्हणाले.
बॅंका आता विक्रमी नफ्यासाठी ओळखल्या जातात
पूर्वीच्या सरकारच्या काळात नेते आणि त्यांच्या परिवाराच्या मर्जीतील लोकांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली जात होती. या कर्जांची परतफेड केली जात नव्हती. बँका हजारो कोटी रुपयांचे घोटाळे आणि एनपीए यासाठी ओळखल्या जात होत्या. आपल्या सरकारने हे सर्व प्रकार रोखले. बँक व्यवस्थापन मजबूत केले. आता बॅंका विक्रमी नफ्यासाठी ओळखल्या जातात. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
८ महिन्यांत ४.३३ लाख लोकांना मिळाल्या नाेकऱ्या
पंतप्रधानांनी २२ ऑक्टाेबर २०२२ रोजी राेजगार मेळाव्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात केली हाेती.
२०२३ च्या अखेरपर्यंत १० लाख सरकारी नाेकऱ्या देण्याचे लक्ष्य असल्याचे माेदी यांनी सांगितले हाेते.
तेव्हापासून ४.३३ लाख जणांना नियुक्तिपत्रे दिली आहेत.
या विभागांमध्ये नियुक्त्या
महसूल, वित्तीय सेवा, टपाल, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, संरक्षण, आराेग्य व कुटुंब कल्याण, गृह मंत्रालय, जलसंधारण, इत्यादी विभागांमध्ये नियुक्त्या हाेणार आहेत.