'आम्हाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवेत, पण...', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ठेवली ही अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:40 IST2024-12-13T16:36:57+5:302024-12-13T16:40:09+5:30
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा भारत-पाक संबंधांवर भाष्य केले.

'आम्हाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवेत, पण...', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ठेवली ही अट
S Jaishankar : मागील अनेक दशकांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तानने अनेकदा भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे, पण भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत प्रत्येकवेळी पाकिस्तानची मैत्री धुडकावून लावली आहे. दरम्यान, आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर भारत-पाक संबंधांवर महत्वाचे भाष्य केले आहे.
शुक्रवारी (13 डिसेंबर 2024) लोकसभेत बोलताना जयशंकर म्हणाले की, भारताला इतर शेजारी देशांप्रमाणे पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत, परंतु आम्हाला दहशतवादमुक्त शेजारी पाहिजेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार नवीन जिंदाल यांनी लोकसभेत विचारले की, भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी ही माहिती दिली.
जयशंकर पुढे म्हणाले, भारताची दहशतवादाबाबतची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि ती पाकिस्तानलाही वारंवार सांगण्यात आली आहे. पाकिस्तानने त्यांचे वर्तन बदलले नाही, तर त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल. पाकिस्तानने आधी दहशतवाद थांबवावा अशी आमची इच्छा आहे. पाकिस्तानला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. त्यामुळे या प्रकरणाचा चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात आहे आणि त्याचे काय करायचे, हे त्यांनी ठरवावे.
भारताने वारंवार पाकिस्तानसोबत सीमापार असलेल्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र जाऊ शकत नाही, यावर आम्ही नेहमी भर दिलाय. यावेळी जयशंकर यांनी व्यापार संबंध बिघडल्याबद्दल पाकिस्तानला जबाबदार धरले आणि सांगितले की, 2019 मध्ये त्यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे द्वीपक्षीय व्यापारात ज्यामुळे व्यत्यय आला आहे.