'आम्ही पैसेही परत करू, पण...'; बॉक्सर विजेंदरसिंगचं ब्रीजभूषण सिंहांना चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 04:42 PM2023-05-31T16:42:46+5:302023-05-31T18:40:33+5:30
विजेंदर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत ब्रीजभूषण सिंह यांना फटकारलं आहे. काहीजण तोंडात गुटखा खाऊन म्हणतात की, मेडल परत काय करता, सरकारने दिलेले बक्षिसाचे पैसे परत करा.
नवी दिल्ली - देशातील ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि राष्ट्रीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रीजभूषणसिंह यांच्याविरुद्ध आंदोलन पुकारले असून त्यांनी जिंकलेली पदक गंगा नदीत सोडण्याचा इशारा दिला आहे. आंदोलक कुस्तीपटू सोमवारी हरयाणातील गंगा घाटावर पोहोचले होते. त्यावेळी, हाती मेडल आणि सन्मान चिन्ह घेऊन त्यांना अश्रू अनावर झाले. देशभरातून या घटनेचा संताप व्यक्त होत होता. तर खासदार बृजभूषणसिंह यांनी मेडलवर भाष्य करताना सरकारने दिलेले पैसेही देण्याचं म्हटलं होतं. आता, यावर बॉक्सर विजेंदर सिंगने आपलं मत मांडलं आहे. तसेच, ब्रीजभूषण यांना चॅलेंजही दिलं आहे.
विजेंदर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत बृजभूषण सिंह यांना फटकारलं आहे. काहीजण तोंडात गुटखा खाऊन म्हणतात की, मेडल परत काय करता, सरकारने दिलेले बक्षिसाचे पैसे परत करा. त्यावरुन, विजेंदर सिंगने प्रत्युत्तर दिलंय. तसेच, अमेरिकेतील बॉक्सरने आपलं पदक नदीत बुडवलं होत. वर्णभेदावरुन झालेला अपमान सहन न झाल्याने त्याने ही कृती केली आणि अमेरिकेत क्रांती झाली, असे उदाहरण विजेंदरने सांगितलं. तसेच, अनेकांना माहिती नाही, ऑलिपिंक स्पर्धा काय असते. अगोदर तालुक्यात नंबर १ खेळावं लागतं, पुन्हा जिल्हा, राज्य आणि देशात नंबर वन बनावं लागतं. त्यानंतर, आशियात नंबर वन राहिलात तर ऑलिंपिक स्पर्धेत जातं येतं. पण, गुटखा खाऊन काहीजण म्हणतात मेडल परत करण्याऐवजी पैसे परत करा. होय, आम्ही सरकारचे पैसेही परत करू, पण अगोदर तुम्ही मेडल आणून दाखवा, मग बोला... असं चॅलेंजच विजेंदर सिंगने खासदार ब्रीजभूषण सिंह यांना दिलं आहे.
बहुत लोगों को पता भी नहीं होगा कि ओलंपिक क्या होता है?
— Congress (@INCIndia) May 31, 2023
कई लोग गुटखा खाकर कहते हैं ये ओलंपिक मेडल ही नहीं, हमारे पैसे भी दो।
अगर सरकार चाहेगी तो हम पैसे भी दे देंगे। आप पहले मेडल लाकर दिखाओ, फिर बात करना।
: @boxervijender जी pic.twitter.com/VkPp7Xj5Qc
२०१६ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती विनेश फोगट आणि टोक्यो २०२० कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया यांसारखे भारतातील काही नामवंत कुस्तीपटू लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या ब्रीजभूषण सिंग यांच्या विरोधात एका महिन्यापासून जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत. सिंग यांच्यावर सात महिला कुस्तीपटूंचा छळ करण्याचा ( त्यापैकी एक अल्पवयीन आहे) आरोप आहे. त्यात सरकार ऐकत नसल्याने मंगळवारी कुस्तीपटूंनी पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. पण, तो ५ दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. आता यावरुन अनेकांनी प्रतिक्रिया देत पैलवानांना पाठिंबा दर्शवला आहे. तर, ब्रीजभूषण सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले ब्रीजभूषणसिंह
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ६६ वर्षीय खासदार सिंह यांनी आरोप फेटाळून लावले आहेत आणि हे आंदोलन "राजकीयदृष्ट्या प्रेरित" असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले,'' लैंगिक शोषण केव्हा झालं, कुठे झालं अन् कोणासोबत झालं... हे सांगा... माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झालं तर मी स्वतः फासावर लटकेन... ४ महिने झाले, मला फाशीवर लटकवायचं आहे. सरकार मला फासावर चढवत नाही हे पाहून मेडल गंगेत विसर्जित करत आहेत. गंगेत पदक विसर्जित केल्याने मला फाशी नाही मिळणार. माझ्यावर आरोप करण्याऱ्यांनो, तुमच्याकडे पुरावा आहे, तर पोलिसांना द्या, न्यायालयाला दा. त्यांनी मला शिक्षा दिल्यास ती मला मान्य आहे. माझ्यासमोर ही नौटंकी करू नका.''